Nobel Peace Prize 2025: डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगलं, ‘या’ महिलेने शांततेच्या नोबेल पुरस्कारावर कोरलं नाव

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली. मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. मी भारत-पाकिस्तान युद्धासह सात युद्धे थांबवली आहेत, त्यामुळे हा पुरस्कार मला मिळावा असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मात्र त्यांना हा पुरस्कार मिलालेला नाही.

Nobel Peace Prize 2025: डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगलं, या महिलेने शांततेच्या नोबेल पुरस्कारावर कोरलं नाव
Donald Trump Nobel
| Updated on: Oct 10, 2025 | 3:35 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली. मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी 338 उमेदवार रिंगणात होते. यात ट्र्म्प यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. त्यांनी स्वतः नोबेल पुरस्कारावर दावाही केला होता. मी भारत-पाकिस्तान युद्धासह सात युद्धे थांबवली आहेत, त्यामुळे हा पुरस्कार मला मिळावा असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शांततेच्या नोबेल पुरस्काराबाबत नोबेल समितीने सांगितले की, लोकशाही हक्कांसाठीच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी, हुकूमशाहीपासून शांततापूर्ण लोकशाहीकडे संक्रमण करण्यासाठीच्या संघर्षासाठी मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात येत आहे. य़ामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं नोबेल पुरस्कार जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे.

कोण आहेत मारिया कोरिना मचाडो ?

मारिया कोरिना मचाडो यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1967 रोजी व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे झाला. त्यांना आंद्रेस बेलो कॅथोलिक विद्यापीठातून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आणि इन्स्टिट्यूटो डी एस्टुडिओस सुपीरियर्स डी अॅडमिनिस्ट्रेसिओनमधून वित्त विषयात पदवी प्राप्त केली. त्या व्हेंटे व्हेनेझुएला पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक आहेत. 2018 मध्ये बीबीसीच्या 100 सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये आणि 2025 मध्ये टाइम मासिकाच्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होता. निकोलस मादुरो सरकारने तिला देश सोडण्यास बंदी घातली होती. आता त्यांना लोकशाही हक्कांसाठीच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी नोबेल पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.

ट्रम्प यांना आठ देशांचा पाठिंबा

डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार पुरस्कार मिळावा यासाठी आठ देशांनी पाठिंबा दिला होता. यामध्ये पाकिस्तान आणि इस्रायल व्यतिरिक्त अमेरिका, आर्मेनिया, अझरबैजान, माल्टा आणि कंबोडिया या देशांचा समावेश आहे. मात्र यात मारिया कोरिना मचाडो यांनी बाजी मारली आहे.