डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब! थेट 25 टक्के कर लावण्याची घोषणा, जगभरात खळबळ

Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा टॅरिफ बॉम्ब टाकला आहे, ज्यामुळे जागतिक व्यापार तणाव निर्माण झाला आहे. ही कृती 'अमेरिका फर्स्ट' धोरणाचाच एक भाग असून, तिचा जागतिक बाजारपेठा आणि व्यापारी संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब! थेट 25 टक्के कर लावण्याची घोषणा, जगभरात खळबळ
Donald Trump
Image Credit source: Google
| Updated on: May 01, 2026 | 10:23 PM

गेल्या काही काळापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाची झोप उडवलेली आहे. त्यांनी आधी जगातील अनेक देशांवर टॅरिफ लावले होते, त्यानंतर इराणसोबत झालेल्या युद्धामुळे जगाला त्रासाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगाची झोप उडवली आहे. अमेरिकेने टॅरिफची घोषणा केली आहे. पुढील आठवड्यापासून युरोपीयन युनियनमधून अमेरिकेत येणाऱ्या कार आणि ट्रकवर 25 टक्के टॅरिफ अतिरिक्त टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. युरोपियन युनियनने आधी झालेल्या व्यापार कराराचे पालन केलेले नाही. त्यामुळे हे टॅरिफ लादण्यात येत असल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली आहे.

25 टक्के टॅरिफची घोषणा

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर लिहिले की, ‘युरोपियन युनियन आपल्या पूर्णतः मान्य झालेल्या व्यापार कराराचे पालन करत नाही, त्यामुळे पुढील आठवड्यात मी अमेरिकेत येणाऱ्या कार आणि ट्रकवर टॅरिफ वाढवणार आहे. हे टॅरिफ 25% पर्यंत वाढवले जाईल. जर त्यांनी अमेरिकेतच कार आणि ट्रकचे उत्पादन केले, तर कोणताही टॅरिफ लागणार नाही. सध्या अनेक कंपन्या ऑटोमोबाइल आणि ट्रक प्लांट्स उभारणीच्या टप्प्यात आहेत, ज्यामध्ये 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक होत आहे. हा वाहन निर्मितीच्या इतिहासातील एक विक्रम आहे. या प्लांट्समध्ये अमेरिकन कामगार काम करतील आणि ते लवकरच सुरू होतील. आज अमेरिकेत जे घडत आहे, ते यापूर्वी कधीच झाले नाही.’

अमेरिका फर्स्ट धोरण

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेने अमेरिका फर्स्ट हे व्यापार धोरण अधिक आक्रमकपणे राबवले आहे. यात भारतासह अनेक देशांवर टॅरिफ लावण्यात आलेले आहे. या टॅरिफचा उद्देश स्वस्त परदेशी आयातीपासून देशांतर्गत उद्योगांचे संरक्षण करणे आणि उत्पादन क्षेत्र मजबूत करणे हा आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर दबाव वाढू शकतो आणि अनेक देशांमधील व्यापार तणावही वाढू शकतो. त्यामुळे याचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे.

भारत-अमेरिका व्यापार करार होण्याची शक्यता

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरही 25 टक्के टॅरिफ लावले होते. भारत रशियाकडून तेल खरेदी करत होता, त्यामुळे ते 50 टक्क्यांपर्यंत वाढवले गेले होते. मात्र नंतर ट्रम्प यांनी दावा केला की भारत रशियाकडून तेल आयात करणार नाही, त्यामुळे 25 टक्के टॅरिफ हटवण्यात आले होते. सध्या भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारावर चर्चा सुरू आहेत. हा करार झाल्यास टॅरिफ आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

 

Follow Us