
ब्राझीलच्या रियो डी जेनेरो येथे ड्रग लॉर्डस आणि पोलिसांमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. पोलीस हेलिकॉप्टरमधून बॉम्बफेक करत आहेत, तर ड्रग माफिया ड्रोनव्दारे पोलिसांवर हल्ला करत आहे. गोळ्यांचा आवाजाने रियो डी जेनेरोचा गल्लीबोळ हादरुन गेलाय. गल्लीबोळात ड्रग लॉर्डसचे मृतदेह पडलेले आहेत. ब्राझील पोलिसांनी ड्रग माफिया रेड कमांडो विरुद्ध ब्राझीलच्या इतिहासातील सर्वात मोठं ऑपरेशन सुरु केलय. पोलिसांच्या कारवाईत 60 ड्रग तस्कर ठार झालेत. समांतर सरकार चालवणाऱ्या ड्रग तस्करांनी पोलिसांना टार्गेट केलं आहे. या ऑपरेशनमध्ये चार पोलीस शहीद झाले आहेत. या ऑपरेशनमध्ये आतापर्यंत एकूण 64 जणांचा मृत्यू झाला आहे.
रियो डी जेनेरोमध्ये ब्राझील पोलिसांच हे ऑपरेशन सुरु आहे. युद्धासारखी स्थिती आहे. रियो डि जेनेरो बऱ्याच काळापासून Comando Vermelho (CV), Terceiro Comando Puro (TCP) सारख्या ड्रग लॉर्डसच्या ताब्यात होतं. ड्रग तस्करीच सिंडिकेट चालवणाऱ्या Comando Vermelho ना ब्राझीलमधअेय रेड कमांडो म्हटलं जातं. रियो सरकारनुसार, या ऑपरेशनमध्ये जवळपास 2500 पोलीस आणि सैनिक सहभागी झालेले. Comando Vermelho (लाल कमांडो) ड्रग तस्करी गँगला टार्गेट करणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. ही गँग शहराच्या गरीब भागात सक्रीय आहे.
माफियाचे 60 लोक मारले गेले
पोलिसांनी ड्रग तस्करांविरोधात कारवाई करताना हेलिकॉप्टर्स आणि चिलखती वाहनांद्वारे छापेमारीची कारवाई केली. या दरम्यान मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. ऑपरेशन दरम्यान अनेक ठिकाणी आगी लावण्याच्या घटना घडल्या. पोलिसांनी जवळपास 81 संशयितांना अटक केली आहे. माफियाचे 60 लोक मारले गेले. यात 4 पोलीसही शहीद झाले.
200 किलो कोकेन जप्त
पोलिसांनी 75 पेक्षा अधिक रायफल्स आणि मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केले आहेत. या ऑपरेशनला रियोच्या इतिहासातील सर्वात मोठं आणि खुनी अभियान म्हटलं जात आहे. पोलीस ड्रग माफियाच्या समूळ उच्चाटनासाठी मिशन चालवत आहेत. त्यांच्या प्रत्येक ठिकाणावर छापेमारीची कारवाई सुरु आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात 200 किलो कोकेन जप्त केलं आहे. त्यांच्या हाती रक्कम सुद्धा लागली आहे. काही शस्त्र सुद्धा त्यांच्या हाती लागली आहेत.