मृत्यूचा संकेत देणारी मांजर, जेथे बसते त्या व्यक्तीचा होतो मृत्यू, पाहून डॉक्टरही घाबरले

जे डॉक्टर सांगू शकत नाहीत ते हे मांजर सांगते. कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू जवळ आला की हे मांजर त्याच्या बेडजवळ जाऊन बसते अन् त्या व्यक्तीचा काही तासांमध्ये होतो मृत्यू. हे पाहून डॉक्टरही झाले थक्क.

मृत्यूचा संकेत देणारी मांजर, जेथे बसते त्या व्यक्तीचा होतो मृत्यू, पाहून डॉक्टरही घाबरले
Image Credit source: Social media
| Updated on: May 17, 2026 | 3:31 PM

अमेरिकेच्या पूर्वोत्तर भागातील ऱ्होड आयलंड राज्यामधील एका नर्सिंग होममध्ये राहणाऱ्या ‘ऑस्कर’ नावाच्या मांजराने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण हे मांजर रुग्णांच्या मृत्यूची अचूक चाहूल ओळखते असा दावा केला जातो. ज्या रुग्णाचा मृत्यू जवळ आला असतो, त्या रुग्णाच्या पलंगाजवळ जाऊन ऑस्कर शांतपणे बसते. अनेक वेळा डॉक्टरांच्या अंदाजालाही या मांजराने चुकीचे ठरवले असल्याची चर्चा आहे.

Steere House Nursing and Rehabilitation Center या नर्सिंग आणि पुनर्वसन केंद्रातील डिमेन्शिया विभागात ऑस्करचे संगोपन झाले. हे मांजर विशेषतः अल्झायमर आणि पार्किन्सनसारख्या आजारांनी ग्रस्त वृद्ध रुग्णांच्या परिसरात सतत फिरत असते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मते, ऑस्कर सामान्यतः एका खोलीतून दुसऱ्या खोलीत खेळत फिरते; मात्र एखाद्या रुग्णाचा शेवट जवळ आला की ते त्याच्या पलंगाजवळ जाऊन तासन्तास बसून राहते.

100 हून अधिक मृत्यूंची अचूक चाहूल

डेव्हिड डोसा यांनी आपल्या Making Rounds with Oscar या पुस्तकात ऑस्करबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या मते, ऑस्करने आतापर्यंत 100 पेक्षा अधिक रुग्णांच्या मृत्यूची अचूक चाहूल दिली होती. रुग्णालयातील कर्मचारी सांगतात की, अनेकदा ऑस्करला दुसऱ्या खोलीत नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण ते पुन्हा त्या रुग्णाच्या खोलीबाहेर जाऊन दरवाजा ओरबाडत बसत असे. दरवाजा उघडताच ते थेट गंभीर रुग्णाजवळ जाऊन शांत बसत असे. काही तासांत किंवा दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत.

डॉक्टरांनाही पडला प्रश्न

एका घटनेत ऑस्कर अशा रुग्णाजवळ जाऊन बसले ज्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांना वाटत होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही आश्चर्य वाटले. मात्र त्याच रात्री त्या रुग्णाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अनेकांनी ऑस्करच्या क्षमतेबद्दल गंभीरपणे विचार सुरू केला. रुग्णालयातील कर्मचारी सांगतात की, ऑस्कर एखाद्या रुग्णाजवळ जाऊन बसले की ते संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना तातडीने बोलावून घेतात, जेणेकरून शेवटच्या क्षणी कुटुंबीयांना आपल्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवता येतो.

वैज्ञानिकांचे स्पष्टीकरण काय?

वैज्ञानिकांच्या मते, काही प्राण्यांमध्ये मानवी शरीरातील सूक्ष्म बदल ओळखण्याची विलक्षण क्षमता असते. मृत्यू जवळ आल्यावर शरीरातील मेटाबोलिझम, तापमान, रसायनिक प्रक्रिया आणि वर्तनात बदल होतात. मांजरांची वास घेण्याची क्षमता अत्यंत तीव्र असल्यामुळे ते हे बदल आधीच ओळखू शकतात.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ऑस्कर कोणतीही अलौकिक भविष्यवाणी करत नाही तर शरीरातील जैविक बदलांना प्रतिसाद देत असावे. तरीही या मांजराच्या अचूक निरीक्षणांमुळे डॉक्टर आणि संशोधकही आश्चर्यचकित झाले आहेत.

Follow Us