Brics Summit 2026 : जिनपिंग यांनी भारतात पाऊल ठेवण्याआधीच चीनकडून खूप मोठं, अपेक्षा वाढवणारं पॉझिटिव्ह वक्तव्य
Brics Summit 2026 : भारत आणि चीनमध्ये अनेक मुद्यांवरुन मतभेद असताना मोदी-जिनपिंग भेट होणार आहे. सीमावादावर दोन्ही देश अनेक वर्षांपासून परस्परांशी चर्चा करत आहेत, पण त्यावर कुठलाही तोडगा निघालेला नाही. अलीकडेच दोन्ही बाजूंकडून चर्चा पुढे नेण्याचा प्रयत्न झालाय.

ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग भारत दौऱ्यावर रवाना झाले आहेत. ते दिल्लीत दाखल होण्याआधी चीनने भारतासोबतच्या संबंधांवर मोठं विधान केलं आहे. “दोन्ही देशांनी आपले मतभेद योग्यपणे हाताळून चांगले शेजारी आणि मित्र आहोत या भावनेने पुढे गेलं पाहिजे” असं चीनने म्हटलं आहे. त्याशिवाय चर्चा वाढवण्यावर भर दिला आहे. पीएम मोदी आणि शी जिनपिंग यांच्या बैठकीआधी आलेल्या या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलय. भारतातील चीनचे राजदूत शू फेइहोंग म्हणाले की, “बीजिंग आणि नवीन दिल्ली दोन्ही नेत्यांमधील द्विपक्षीय बैठकीची तयारी करत आहे. दीर्घकालीन दृष्टीकोनातून चीनला भारतासोबतचे संबंध विकसित करायचे आहेत. त्यासाठी चर्चा वाढवण्याची आणि सहकार्य भक्कम करण्याची गरज आहे” दोन्ही देश परस्परांचे चांगले शेजारी बनले पाहिजेत तसचं परस्पराच्या यशात मदत करणारे भागीदार बनून पुढे गेलं पाहिजे असं चीनने म्हटलं आहे.
दोन्ही नेत्यांचा जो रणनितीक विचार आहे, त्यानुसार चीन भारतासोबत मिळून काम करेल असं शू फेइहोंग सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हणाले. दोन्ही देशांनी परस्परांशी संवाद वाढवावा यावर त्यांचा भर आहे. सहकार्याचे नवीन मार्ग शोधले पाहिजेत. मतभेदांचे मुद्दे योग्य पद्धतीने हाताळले पाहिजेत. चीनला जे म्हणायचय ते असं आहे की, दोन्ही देशांमध्ये काही मुद्यांवर असहमती असू शकते. पण म्हणून चर्चा बंद नाही झाली पाहिजे. भारत-चीन संबंधांकडे दीर्घकालीन दृष्टीकोनातून पहावं अशी बिजींगची इच्छा आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग काय म्हणाले?
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग सुद्धा भारताबद्दल हेच बोलले. “चीन भारतासोबत संवाद वाढवायला तयार आहे. दोन्ही देशांनी आपल्या संबंधांकडे रणनितीक आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे” माओ निंग सुद्धा हेच म्हणाले की, दोन्ही देशांनी मतभेद योग्य पद्धतीने हाताळले पाहिजेत. भारत आणि चीन चांगले शेजारी असल्याचं ते म्हणाले. दोन्ही देश परस्परांच्या यशात मदत करणारे भागीदार आहेत असं ते म्हणाले.
जिनपिंग शेवटचे भारतात कधी आलेले?
शी जिनपिंग शनिवारी दिल्लीत दाखल होतील. 18 व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी ते येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांची द्विपक्षीय चर्चा होईल. जवळपास सात वर्षानंतर जिनपिंग भारत दौऱ्यावर येत आहेत. याआधी 2019 साली चेन्नईच्या महाबलीपूरम येथे मोदींसोबत अनौपचारिक बैठकीत सहभागी होण्यासाठी जिनपिंग भारतात आले होते.