
China Crime News: चीनमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. इथे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्या देशाव्यतिरिक्त जगासमोर कधीच येत नाहीत. कोरोना महासाथीच्या काळात चीनने कमालीची गुप्तता पाळली होती. सरकारविरोधात बोलण्याचा प्रयत्न केल्यावर इथे वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली अटकेची कारवाई केली जाते. दरम्यान, आता सर्वांनाच अचंबित करणारा एक प्रकार सध्या समोर आला आहे. इथे एका महिला पत्रकाराला तब्बल चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विशेष म्हणजे याआधीही कोरोना महासाथीच्या काळात या महिला पत्रकाराला तब्बल चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
झांग झान यांना ठोठावली चार वर्षांची शिक्षा
मिळालेल्या माहितीनुसार मूळच्या चीनच्या या महिला पत्रकाराचे नाव झांग झान असे आहे. त्यांना याआधी 2020 साली कोरोना महासाथीवर वृत्तांकन केल्याप्रकरणी चार वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. आता त्यांना पुन्हा एकदा एका नव्या प्रकरणात 4 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये त्यांना भांडण करणे तसेच अडचण निर्माण करणे या आरोपांखाली अटक करण्यात आली होती. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या अनेकांना अशा प्रकारे वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली अटक करून शिक्षा ठोठावली जाते. झांग झान सध्या 42 वर्षांच्या आहेत. शांघाय न्यायालयात त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. आता त्यांना चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
देसाची प्रतिमा मलीन केल्याचा करण्यात आला आरोप
या शिक्षेच्या कारवाईनंतर ब्रिटनमध्ये राहणाऱ्या कार्यकर्त्या झेन वांग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये झांग यांना अटक करण्यात आली होती. परदेशी सोशल मीडियाचा वापर करून देशाची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जानेवारी महिन्यात झांग यांनी उपोषण केले होते, असे सांगितले जाते. मात्र त्यांना इच्छेविरुद्ध गॅस्ट्रिक ट्यूबच्या मदतीने जबरदस्तीने जेवण देण्यात आल्याचे सांगितले जाते असे झेन वांग यांनी सांगितले आहे.
जगभरातून होतोय विरोध
दुसरीकडे या कारवाईविरोधात न्यूयॉर्कमधील कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्सच्या आशिया-प्रशांत विभागाच्या बेह लीह यांनी झांग झान यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नसताना कारवाई करण्यात आली आहे. पत्रकारिता केल्यामुळे त्यांचे हे शोषण केले जात आहे. कोणतेही कारण नसताना झांग यांच्यावर करण्यात येत असलेली कारवाई थांबवावी लागेल. त्यांच्याविरोधातील सर्व आरोप परत घेतले पाहिजे तसेच त्यांची त्वरित सुटका केली पाहिजे, असे मत बेह लीह यांनी व्यक्त केले आहे.
2020 साली ठोठावली होती चार वर्षांची शिक्षा
दरम्यान, याआधी झांग झान यांच्यावर 2020 साली कारवाई करण्यात आली होती. कोरोना काळात वुहान शहरातील स्थिती रेकॉर्ड करून त्याबाबत त्यांनी वृत्तांकन केले होते. तसेच अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर 2020 साली त्यांना चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मे 2024 साली त्यांची सुटका करण्यात आली होती. तीन महिन्यानंतर त्यांना लगेच अटक करण्यात आली होती.