महिलेला शिवीगाळ करत भारताविषयी वापरले अपशब्द, चिनी कॅबचालकाच्या मुजोरपणाचा व्हिडीओ व्हायरल
सिंगापूरमध्ये एका चायनीज कॅब ड्रायव्हरने त्याच्या टॅक्सीमध्ये बसलेली महिला आणि तिच्या मुलीला उद्देशून अपशब्द वापरले. त्याने भारताविषयी देखील टिप्पण्णी केल्याचे समोर आले आहे.

सिंगापूर | 26 सप्टेंबर 2023 : सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. सिंगापूरमध्ये एका कॅब ड्रायव्हर (cab driver) आणि महिलेदरम्यान झालेला वाद यामध्ये दिसत असून त्या कॅब ड्रायव्हरने प्रवासी महिला व तिच्या मुलीला उद्देशून अपशब्द (abused woman and her daughter) वापरले आहेत. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांचे त्याकडे लक्ष वेधले गेले आहे. या व्हिडीओमध्ये कॅब ड्रायव्हरने ती महिला आणि तिची मुलगी हिला शिवागाळ केली तसेच तिला भारतीय समजून अपशब्दही वापरल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यावर त्या कॅब ड्रायव्हरची चौकशी सुरू झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारत व चीनमध्ये ताण वाढतच चालल्याचे दिसत आहे. सीमेवरील तणावाचा देशातील नागरिकांवरही परिणाम होत असून अनेक जण चिनी वस्तूंवरही बंदी टाकताना दिसत आहेत. याचदरम्यान एका चिनी कॅब ड्रायव्हरचा हा व्हिडीओ समोर आला असून त्यावर विविध कमेंट्सही ऐकायला मिळत आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण ?
सिंगापूरमध्ये कॅब सेवा पुरवणाऱ्या टाडा कंपनीच्या एका टॅक्सीचा चालक आणि त्यामधील महिला प्रवासी यांच्यात हा वाद झाला. त्याने महिलेवर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचे समोर आले आहे. जॅनेल होडेन असे त्या महिलेचे नाव असून तिने हा व्हिडीओ शेअर करतो हा प्रकार निदर्शनास आणून दिला.
जॅनेल व त्यांची ९ वर्षांची मुलगी टॅक्सीमध्ये बसून एका ठिकाणी जात होत्या. मात्र त्या महिलेने दिलेला पत्ता आणि चुकीचा मार्ग यावरून कॅब चालकाने तिच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली, त्याने तिला शिवीगाळही केली.
महिलेला ज्या ठिकाणी जायचे होते, त्याच मार्गावर काही अडथळे रस्ता बंद होता, त्यामुळे तो ड्रायव्हर चिडला व तिला दोष देऊ लागला. तसेच शिवागाळही केली. महिलेने हा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. त्या कॅबचालकाने तिच्यावर वर्णद्वेषी टीका केली. तो तिला भारतीय समजला आणि तिला मूर्ख संबोधू लागला. तसेच तुम्ही अतिशय वाईट ग्राहक असता, अशी टीकाही त्याने केली.
त्यावर त्या महिलेने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच आपण भारतीय नसून सिंगापोरियन यूरेशियन असल्याचेही तिने स्पष्ट केले. मात्र त्यानंतरही त्याची टीका सुरूच होती. एवढंच नव्हे तर त्याने त्या महिलेच्या मुलीवरही कमेंट केली. तिची उंची कमी असल्याचे सांगत तो तिच्यावरही टीका करत होता.
दरम्यान कॅब सेवा पुरवणारी कंपनी टाडाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आम्ही वर्णद्वेष, भेदभाव किंवा गैरवर्तन सहन करत नाही, असे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले असून संबंधित कॅब चालकाची चौकशी करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.
