Dalai Lama : नव्या दलाई लामांची निवड कशी होणार? पुनर्जन्म की सुवर्ण कलश पद्धत? चीनच्या दाव्यानंतर भारताची परखड भूमिका
तिबेटी बौद्ध धर्माच्या मान्यतेनुसार, दलाई लामांकडे पुनर्जन्म घेण्यासाठी शरीर निवडण्याचे अधिकार असतात. परंतु पुढील नव्या दलाई लामांच्या निवडीवरून परंपरा आणि धारणांमध्ये दीर्घकाळ संघर्ष होण्याची शक्यता आहे.

तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांचा उत्तराधिकारी कोण असणार, त्यांची निवड कशा पद्धतीने केली जाणार, यासंदर्भात सध्या मोठी चर्चा पहायला मिळत आहे. पुढील दलाई लामांच्या निवडीचे अधिकार 600 वर्षे जुन्या संस्थेकडे आणि ‘गेडन फोड्रंग ट्रस्ट’कडे असतील, असं सध्याचे 14 वा दलाई लामा अर्थात तेन्झिन ग्यात्सो ऊर्फ ल्हामा थोंडुप यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे त्यांच्या पुनर्जन्माची मान्यतेवरही त्याच संस्थेकडून निर्णय घेण्यात घेईल, असं दलाई लामा यांनी सांगितलं. सध्याचे 14 वे तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचा येत्या 6 जुलै रोजी 90 वा वाढदिवस आहे. याच दिवशी ते मॅकलॉडगंज इथल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल आणि त्यांची निवड कशी केली जाईल, याबाबत सांगतील. चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाला रोखण्यासाठी दलाई लामा परंपरा बदलू शकतात आणि त्यांचा उत्तराधिकारी आधीच जाहीर करू शकतात, असंही मानलं जात आहे. ...