Shashi Tharoor : भारताच्या डिप्लोमसीचा विजय, पाकिस्तानची साथ देणारा देश झुकला, वक्तव्य घेतलं मागे

Shashi Tharoor : सध्या भारतीय खासदारांची शिष्टमंडळं वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची दहशतवादाविरुद्ध भूमिका आणि पाकिस्तानला उघडं पाडणं, या दुहेरी उद्देशाने सर्वपक्षीय खासदारांना जगभरातील विविध देशात पाठवण्यात आलं आहे. शशी थरुर यांच्या शिष्टमंडळाच्या डिप्लोमसीनंतर एका देशाच्या भूमिकेत बदल झालाय. त्यांनी माघार घेतली.

Shashi Tharoor : भारताच्या डिप्लोमसीचा विजय, पाकिस्तानची साथ देणारा देश झुकला, वक्तव्य घेतलं मागे
Shashi Tharoor
Image Credit source: File photo
| Updated on: May 31, 2025 | 8:37 AM

काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी शुक्रवारी कोलंबियासमोर पाकिस्तानचा खरा चेहरा उघड केला. त्यानंतर कोलंबियाने अधिकृतपणे आपलं वक्तव्य मागे घेतलं. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात झालेल्या मृत्यूबद्दल कोलंबियाने संवेदना व्यक्त केल्या होत्या. त्या संदर्भातील स्टेटमेंट कोलंबियाने मागे घेतलं आहे. भारताच्या सैन्य कारवाईत पाकिस्तानला झालेल्या नुकसानीबद्दल कोलंबियाने आधी निराशा व्यक्त केली होती. त्यावर शशी थरुर यांनी चिंता व्यक्त केली. भारत कोलंबियन सरकारच्या प्रतिक्रियेवर निराश असल्याच थरुर यांनी म्हटलं होतं. भारतातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ सध्या विविध देशांच्या दौऱ्यावर आहेत. तिथे जाऊन ते पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा जगाला दाखवत आहेत. काँग्रेस खासदार शशी थरुर हे अमेरिका, कोलंबिया तसच अन्य देशांच्या दौऱ्यावर गेलेल्या शिष्टमंडळाच नेतृत्व करतायत.

भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत बैठक झाल्यानंतर कोलंबियाच्या उपविदेश मंत्री रोसा योलांडा विलाविसेनियो म्हणाल्या की, “आज आम्हाला जे स्पष्टीकरण मिळालं, त्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, वास्तविक स्थिती, संघर्ष आणि काश्मीरमध्ये जे काही झालं, त्या संदर्भात आमच्याकडे जी माहिती आहे, त्या आधाराव चर्चा कायम सुरु ठेवता येईल”

शशी थरुर काय म्हणाले?

कोलंबियाने आपलं वक्तव्य मागे घेतलं, त्यावर काँग्रेस खासदार शशी थरुर म्हणाले की, “उपविदेश मंत्र्यांनी खूप विनम्रतापूर्वक आपलं स्टेटमेंट मागे घेतलं, ज्या संदर्भात आम्ही चिंता व्यक्त केलेली. ते या प्रकरणात आमची बाजू समजून घेतायत, ते आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे”

शिष्टमंडळं वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर

22 एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर तीन दिवस भारत-पाकिस्तानमध्ये संघर्ष झाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळं वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर आहेत. दहशतवादाला असलेलं पाकिस्तानच समर्थन आणि दहशतवादाबद्दल भारताची झिरो टॉलरेंस निती याची जगाला माहिती व्हावी, यासाठी शशी थरुर अमेरिका आणि कोलंबियाच्या दौऱ्यावर आहेत.

कोलंबियाने वेगळी भूमिका घेतलेली

गुरुवारी कोलंबियाच्या राजधानीत एका पत्रकार परिषदेत शशी थरुर यांनी दहशतवादाबद्दल भारताची भूमिका विस्ताराने मांडली. ते ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर कोलंबियाच्या प्रतिक्रियेबद्दल निराशा व्यक्त केली. प्रतिनिधीमंडळात असलेले भाजप खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले की, “थरुर यांनी दहशतवादाबद्दलची भारताची भूमिका स्पष्ट केली. कोलंबियाच्या प्रतिक्रियेवर निराशा व्यक्त केली” कोलंबियाने भारतातील दहशतवादी पीडितांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी पाकिस्तानात झालेल्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केलेली.