Pakistan Diwali: पाकिस्तानी पंतप्रधानांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, म्हणाले हिंदू समुदाय देशाचा अविभाज्य भाग
Diwali in Pakistan: पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हिंदू समुदायाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी अल्पसंख्याक समाजाच्या अधिकाराचे रक्षण आणि सामाजिक सलोख्यावर भर दिला.

Diwali in Pakistan: भारतातच नाही तर जगभरात दिवाळी साजरी होते. शेजारील देश पाकिस्तानमध्ये सुद्धा दिवाळी धामधुमीने साजरी करण्यात येते. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हिंदू समुदायाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी अल्पसंख्याक समाजाच्या अधिकाराचे रक्षण आणि सामाजिक सलोख्यावर भर दिला. द्वेषावर विजयाचे दिवाळी हे प्रतिक असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तानच्या विकासात हिंदू समुदायाचे मोठे योगदान असल्याचे कौतुकही त्यांनी केले.
दीपावळीच्या या पर्वावर पाकिस्तानातील हिंदू समुदायाने मंदिरात पाठपूजा केली. दिवे, पणत्यांची आरस केली. आसिफ अली झरदारी आणि शहबाज शरीफ यांनी रविवारी स्वतंत्र संदेश देत देशात बंधुभाव आणि देशातील विकासात अल्पसंख्यांक समुदायाचे मोठे योगदान असल्याचे म्हटले. रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तानुसार, राष्ट्रपती झरदारी आणि पंतप्रधान शरीफ यांनी त्यांच्या संदेशात दिवाळीचा सण हा द्वेष, असहिष्णुता आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतिक असल्याचे म्हटले. हा सण सामाजिक जीवनाचा संदेश देत शांततापूर्ण जीवनाचा, भरभराटीचा संदेश देत असल्याचे म्हटले आहे.
हिंदू समुदाय देशाचा अविभाज्य भाग
राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी त्यांच्या संदेशात म्हटले की, धार्मिक अल्पसंख्यांकाच्या अधिकाराचे रक्षण करण्याची जबाबदारी बहुसंख्य समाजाची सुद्धा आहे. पाकिस्तानातील हिंदू समुदाय हा राष्ट्रीय जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. शिक्षण, आरोग्य सेवा, व्यवसाय, लोकसेवा, समाज कल्याण, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात हिंदू समुदायाचे योगदान मोठे आहे. पाकिस्तानला समृद्ध करण्यात हिंदूचाही मोलाचा वाटा आहे.
तर पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हिंदू समुदायाला देशाच्या सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा धागा म्हटले. धर्म, श्रद्धा, रंग वा वर्ण भेदाविना देशातील नागरिकांना अधिकार, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा आणि धार्मिक स्वतंत्रता जपण्यासाठी त्यांचे सरकार कटिबद्ध असल्याचे शरीफ यांनी सांगितले. हिंदू समुदायाचे प्रमाण घटण्याची चिंता सातत्याने व्यक्त होत असताना या दोन्ही नेत्यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा दिवाळीची धूम दिसत आहे.