आज फ्रान्स जळत आहे कारण…, डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक दावा, दिलं अमेरिकेचं उदाहरण
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्समध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना मोठा दावा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्याची आता संपूर्ण जगभरात चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्समध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना मोठा दावा केला आहे. फ्रान्समध्ये शिक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. मात्र ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, फ्रान्समध्ये सध्या जे आंदोलन सुरू आहे, ते मुळात शिक्षणाच्या मुद्द्यावर सुरूच झालेलं नाही. फ्रान्स आज जळत आहे कारण, त्यांनी आपल्या सीमा अशा लोकांसाठी खुल्या केल्या, जे लोक फ्रान्सचा द्वेष करतात. जॉर्जियामध्ये रिपब्लिकन उमेदवारांसाठी एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं, या रॅलीमध्ये भाषण करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केला आहे. फ्रान्समध्ये पोलीस आहेत, परंतु त्यांना आपलं काम करण्याचा अधिकार नाही, असं देखील या रॅलीमध्ये ट्रम्प यांनी म्हटलं आहे, या आंदोलनामध्ये जेवढे काही लोक सहभागी झाले आहेत, ते सर्व लोक फ्रान्सचा द्वेष करतात, असंही यावेळी ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांनी फ्रान्सची तुलना अमेरिकेसोबत केली आहे. अमेरिकेमध्ये इमिग्रेशन पॉलिसी अत्यंत कडक आहे. आम्ही फ्रान्स सारखे नाही आहोत, की जे लोकं तुमचा द्वेष करतात, त्यांनाच तुम्ही तुमच्या देशात प्रवेश देत आहात. मात्र आमच्याकडेही जॉर्जियाचे सीनेटर ओसॉफ यांना अमेरिकेच्या विरोधात असलेल्या थर्ड वर्ल्डमधील लाखो लोकांना अमेरिकेमध्ये आणण्याची इच्छा आहे, असं म्हणत त्यांनी यावेळी सीनेटर ओसॉफ यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. हे लोक फक्त आमच्या संस्कृतीला नष्ट करण्याचं टार्गेट घेऊनच येतात, मात्र आम्ही हे कदापिही होऊ देणार नाही, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे दुसर्यांदा राष्ट्रपती बनल्यानंतर त्यांनी अमेरिकेची इमिग्रेशन पॉलिसी अत्यंत कडक केली आहे. त्यांनी आतापर्यंत तीन लाखांपेक्षा अधिक व्हिसा रद्द केले आहेत. तसेच अमेरिकेचा जर नव्याने व्हिसा मिळवायचा असेल तर त्यासाठी देखील प्रक्रिया अत्यंत कडक करण्यात आली आहे. याचा मोठा फटका आता अमेरिकेत स्थलांतरित होण्याची इच्छा असलेल्या लोकांना बसत आहे.
