
Free Beer Offer : गेल्या काही वर्षात अनेक देशांत सत्ताबदल झाला. या सत्ताबदलामुळे त्या-त्या देशांतील सामाजिक, राजकीय स्थिती बरीच बदलली आहे. अमेरिका हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ‘अमेरिका फस्ट’ या धोरणाचा पुरस्कार करतात. या धोरणाअंतर्गत ते नोकरी, व्यवसाय, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांत मूळच्या अमेरिकन नागरिकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतात. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसखोरी करणारे तसे स्थलांतरीतांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. ट्रम्प यांचे हेच धोरण आता तेथील समाजातही दिसू लागले आहे. त्याचीच प्रचिता आता आली असून एका बार मालकाने स्थलांतरीतांची माहिती देणाऱ्यांना तसेच स्थलांतरीतांना हद्दपार करणाऱ्यांना थेट मोफत बिअर देण्याची ऑफर दिली आहे. या ऑफरची आता अमेरिकेसह इतर देशांतही चर्चा होत आहे.
बऱ्याच दिवासांपासून अमेरिकेत स्थलांतरीतांविरोधात मोहीम राबवली जात आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर तर या प्रक्रियेला चांगलाच वेग आला आहे. आता अमेरिकन प्रशासनासोबतच तेथील सामान्य लोकदेखील स्थलांतरीतांना अमेरिकेबाहेर पाठवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. आयडाहो राज्यातील ईगल शहरामधील एका बारमालकाने तर स्थलांतरीतांना देशाबाहेर काढण्यासाठी सामान्यांना खास ऑफर दिली आहे. स्थलांतरीत, अवैध पद्धतीने देशात घुसखोरी केलेल्यांची माहिती देणाऱ्यांना तसेच स्थलांतरीतांना देशाबाहेर काढणाऱ्यांना एक महिना मोफत बिअर देण्याची ऑफर दिली आहे. स्थलांतरीतांची माहिती देणाऱ्यांना पूर्ण एक महिना मोफत बिअर दिली जाणार आहे. बारमालकाची ही ऑफर सध्या इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. लोक या ऑफरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
या बारमालकाचे नाव मार्क फिट्झपॅट्रिक असे आहे. ते डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक मानले जातात. एलजीबीटीक्यू+ यांच्या प्राईड मंथला उत्तर म्हणून त्यांनी हेट्रोसेक्शुअल ऑसमनेस मंथ साजरा करण्यास सुरुवात केली होती. 2024 साली त्यांनी त्यांच्या बारमध्ये हेट्रोसेक्शुअल लोकांसाठी मद्यप्राशन करण्यासाठी खास ऑफर दिली होती. आता त्यांनीच स्थलांतरीतांची माहिती देणऱ्यांना मोफत बिअर देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. या ऑफरबाबत नेमकं काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.