तिच्यासोबत एक रात्र…; जगातील मोस्ट वाँटेड ड्रग लॉर्डच्या शेवटाची इनसाइड स्टोरी

जगातील मोस्ट वाँटेड ड्रग लॉर्ड एल मेंचोचा मेक्सिकन सैन्याने खात्मा केला. त्याचं लोकेशन कशा पद्धतीने ट्रॅक करण्यात आलं आणि त्यात कोणाची मोठी मदत मिळाली, याचा खुलासा मेक्सिकन सैन्याने केला आहे.

तिच्यासोबत एक रात्र...; जगातील मोस्ट वाँटेड ड्रग लॉर्डच्या शेवटाची इनसाइड स्टोरी
एल मेंचो
Image Credit source: ANI
| Updated on: Feb 24, 2026 | 11:29 AM

जगातील मोस्ट वाँटेड ड्रग्ज तस्करांपैकी एक एल मेंचोला मेक्सिकन सैन्याने लष्करी कारवाईत ठार मारलं. एल मेंचो हा जलिस्को न्यू जनरेशन कार्टेलचा (CJNG) नेता होता. अमेरिकेत फेंटॅनिल आणि इतर ड्रग्जची मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यासाठी तो कुप्रसिद्ध होता. 22 फेब्रुवारी 2026 रोजी जलिस्को राज्यातील डोंगराळ प्रदेशात असलेल्या तपालपाजवळ ही कारवाई करण्यात आली. अमेरिकन गुप्तचर आणि एल मेंचोच्या गर्लफ्रेंडच्या देखरेखीमुळे त्याचं लपण्याचं ठिकाण उघड झालं होतं. मेक्सिकन संरक्षण मंत्री जनरल रिकार्डो ट्रेव्हिला यांनी 23 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत या कारवाईची सविस्तर माहिती दिली. ट्रेविला यांनी सांगितलं की मेक्सिकन लष्करी गुप्तचर यंत्रणेनं एल मेंचोच्या गर्लफ्रेंडच्या जवळच्या सहकाऱ्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली होती. 20 फेब्रुवारी 2026 रोजी त्याच सहकाऱ्याने महिलेला तपालपाच्या एका ग्रामीण कम्पाऊंडमध्ये पोहोचवलं होतं आणि तिथेच एल मेंचो तिला भेटायला आला होता.

संबंधित महिलेनं मेंचोसोबत रात्र घालवली आणि 21 फेब्रुवारी रोजी ती तिथून निघून गेली. परंतु एल मेंचो आणि त्याचे सुरक्षारक्षक तिथेच थांबले होते. अमेरिकन गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या अतिरिक्त माहितीवरून त्याचा पत्ता मिळू शकला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मेक्सिकन लष्कराने कम्पाऊंडला घेराव घातला. तेव्हा कार्टेलच्या गनमॅनने गोळीबाराला सुरुवात केली. याचदरम्यान ते एल मेंचोला घेऊन जंगलाच्या दिशेने पळाले. या चकमकीत एल मेंचो गंभीर जखमी झाला होता. त्याला हेलिकॉप्टरने मेडिकल फॅसिलिटीतून घेऊन जात असताना रस्त्यातच त्याने प्राण सोडले. यात त्याचे दोन बॉडीगार्ड्ससुद्धा मारले गेले.

मेक्सिकन लष्करानेच हे संपूर्ण ऑपरेशन पार पाडलं. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लाऊडिया शीनबाऊम यांनी स्पष्ट केलं की यात अमेरिकन सैन्याचा सहभाग नव्हता, फक्त त्यांच्याकडून इंटेलिजन्स मदत मिळाली होती. एल मेंचो बऱ्याच काळापासून दोन्ही देशांच्या मोस्ट वाँटेड यादीत होता. अमेरिकेनं त्याच्या अटकेसाठी 15 दशलक्ष डॉलरचं बक्षिस घोषित केलं होतं. सीजेएनजी हा मेक्सिकोचा सर्वांत शक्तिशाली आणि हिंसक कार्टेल मानला जातो. फेंटानिल ड्रग्जच्या पुरवठा साखळीत या कार्टेलची मोठी भूमिका होती.

एल मेंचोच्या मृत्यूनंतर CJNG ने सूड घेण्याचा प्रयत्न केला. काही तासांतच जलिस्को आणि इतर परिसरात कार्टेलच्या गुंडांनी रस्ते अडवले, गाड्या जाळल्या, बिझनेसवर हल्ला केला आणि सुरक्षारक्षकांवर गोळीबार केला. जलिस्कोमध्ये कमीत कमी 25 नॅशनल गार्ड मेंबर्स मारले गेले, तर 30 हून अधिक संशयित कार्टेल सदस्यसुद्धा मारले गेले आहेत. काही राज्यांमध्ये अनेकांना अटकसुद्धा झाली. ही घटना मेक्सिकोच्या ड्रग वॉरमध्ये मोठं टर्निंग पॉईंट मानली जात आहे.