अमेरिकेने व्हिसावर निर्बंध लादले असले तरी दुतावासाने म्हटले – घाबरु नका मिळेल संधी

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसावर निर्बंध लादल्याने भारतातून शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय तरुणांना चिंतेने ग्रासले आहे. या दरम्यान अमेरिकन दुतावासाने एक चांगली बातमी दिली आहे.

अमेरिकेने व्हिसावर निर्बंध लादले असले तरी दुतावासाने म्हटले - घाबरु नका मिळेल संधी
| Updated on: May 28, 2025 | 8:35 PM

अमेरिकेच्या व्हिसा प्रक्रियेतील विलंब आणि पारदर्शकतेवर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांदरम्यान, नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाने स्पष्टीकरण दिले आहे. दूतावासाने म्हटले आहे की व्हिसा अर्ज स्वीकारले जात असून ही प्रक्रिया पूर्णपणे अमेरिकन कायद्यांनुसार चालविली जात आहे. प्रत्येक अर्जदाराची सुरक्षा तपासणी मात्र आवश्यक आहे.पात्र अर्जदारांना संधी मिळणार असल्याने त्यांनी घाबरून जायची काहीही गरज नाही, असे दूतावासाने आश्वासन दिले आहे.

अमेरिकेतील सध्याची परिस्थिती पाहता. तेथील व्हिसा प्रक्रियेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. यामध्ये व्हिसा अर्जांची पुनरावलोकन करण्यात होणारा विलंब आणि पारदर्शकतेचा अभाव यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. या सर्वांमध्ये, नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याने परिस्थिती स्पष्ट केली आहे. ते म्हणतात की व्हिसा प्रक्रियेत कोणतीही हलगर्जीपणा नाही आणि संपूर्ण प्रक्रिया अमेरिकन कायद्यांनुसार चालते.

नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की ते अंतर्गत संवादावर भाष्य करत नाहीत. तथापि, त्यांनी निश्चितपणे स्पष्ट केले की व्हिसा अर्जदारांनी त्यांचे अर्ज सादर करत राहावेत. म्हणजेच अमेरिकेने व्हिसा प्रक्रिया कोणत्याही प्रकारे थांबवण्याचे किंवा मर्यादित करण्याचे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.

दूतावासाच्या प्रवक्त्याने काय म्हटले?

प्रत्येक व्हीसा प्रकरणाची चौकशी आणि प्रक्रिया करण्यासाठी किती वेळ लागतो यावर अमेरिकन वाणिज्य दूतावासांची कार्यक्षमता अवलंबून असते. अमेरिकेची सुरक्षा आणि लोकांची सुरक्षितेता राखण्यासाठी ही चौकशी अत्यंत आवश्यक आहे.त्यामुळे प्रत्येक अर्जांची काळजीपूर्वक तपासणी केली जात आहे असे दूतावासाच्या प्रवक्त्याने म्हटले.

व्हिसा प्रकरणांची चौकशी करताना,कोणताही अर्जदार अमेरिकेच्या सुरक्षेला धोका निर्माण करत नाही याची खात्री केली जाते. म्हणूनच प्रत्येक प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे आणि प्रक्रियेला थोडा जास्त वेळ लागू शकतो. परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा विलंब आवश्यक आहे असे या प्रवक्त्याने म्हटले आहे.

अमेरिकन दूतावासाने या गोष्टी स्पष्ट केल्या

सर्व अमेरिकन वाणिज्य दूतावास वेळोवेळी त्यांच्या कामाचे वेळापत्रक अपडेट करीत राहतात. जेणेकरून ते प्रत्येक प्रकरणाची संपूर्णपणे चौकशी करू शकतील. त्याचा उद्देश संपूर्ण चौकशीशिवाय कोणतीही व्यक्ती अमेरिकेत प्रवेश करू नये याची खात्री बाळगण्यासाठी असल्याचे दूतावासाने स्पष्ट केले आहे.

व्हिसा प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षा दोन्ही महत्त्वाचे आहेत. म्हणून, व्हिसा अर्जदारांनी घाबरू नये आणि त्यांची कागदोपत्री प्रक्रीया सुरुच ठेवावी, अमेरिका सुरक्षेशी तडजोड करीत नसली तरी जे योग्य उमेदवार आहेत. त्या पात्र अर्जदारांना संधी मिळेल असे या निवेदनाद्वारे अमेरिकन दूतावासाने स्पष्ट केले आहे.