कॅप्टन… प्लीज झोपू नका, आम्हाला तुमची गरज आहे… स्मित मच्छार यांचा जीव कुणी वाचवला?
दुबई-इस्रायल फ्लायदुबई विमानात कॅप्टन स्मित मच्छार गंभीर जखमी झाले. डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जीव धोक्यात होता. त्यावेळी तेल अवीवचे दंतवैद्य डॉ. शोता मुसायेव यांनी धाडसाने ४५ मिनिटे त्यांना शुद्धीत ठेवले. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी व त्यांची शुद्ध कायम ठेवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले, ज्यामुळे स्मित मच्छार यांचे प्राण वाचले.

दुबईवरून इस्रायलला जाणाऱ्या फ्लायदुबई फ्लाइटमध्ये झालेल्या थरारक घटनेत भारतीय कॅप्टन स्मित मच्छार गंभीर जखमी झाले. त्यांच्या कवटीला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना डोकेदुखीचा प्रचंड त्रास सुरू झाला होता. त्यावेळी स्मित मच्छार यांचा जीव एका डेंटिस्टने वाचवला. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? याचा थरारक प्रसंग या डॉक्टरने शेअर केला आहे. स्मित मच्छार रक्तबंबाळ झाले होते. त्यावेळी त्यांना 45 मिनिटे शुद्धीत ठेवण्याचं काम या डॉक्टरने केलं. विमानाचं लँडिंग होईपर्यंत हा डॉक्टर स्मित मच्छार यांना शुद्धीत ठेवण्यासाठी संघर्ष करत होता. वेळ हातातून निघून जाऊ नये, याची मला भीती होती, असं या डॉक्टरने सांगितलं. त्यांनी स्मित यांना शुद्धीत ठेवल्यानेच त्यांचे प्राण वाचू शकले.
डॉ. शोता मुसायेव असं या 47 वर्षीय डॉक्टरचं नाव आहे. ते तेल अवीवच्या होलोन या शहरातील रहिवासी आहेत. त्यांनी द नॅशनलला दिलेल्या मुलाखतीत तो थरारक प्रसंग सांगितला. त्यांनी या 45 मिनिटात स्मित यांच्या डोक्यातून आणि हातातून वाहणारे रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला. स्मित यांच्या डाव्या हातातून मोठ्या प्रमाणावर रक्त वाहत होतं. मी जखम दाबण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मी टी शर्टचा वापर केला. पण रक्त थांबणं काही बंद झाला नाही. त्यामुळे मी स्टीवर्ड्सकडून बर्फ घेतला आणि त्याने रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला, असं मुसायेव यांनी सांगितलं.
अन् शरीराची हालचाल थांबली
स्मित यांच्या शरीरातून रक्त वाहत होतं. तसेच त्यांचा रक्तदाब वेगाने कमी होत होता. त्यामुळे आम्ही विमानातील उपलब्ध किट, नॅपकिन आणि बर्फचा वापर करून त्यांना शुद्धीत ठेवण्याचा प्रयत्न केला. अत्याधिक रक्त वाहून मृत्यू होऊ नये म्हणून त्यांच्या डोके आणि मानेतील जखम दाबून ठेवली, असं त्यांनी सांगितलं.
शरीरात रक्ताची कमी झाल्याने स्मित यांचे डोळे बंद होऊ लागले होते. त्यांचे ओठ निळे पडले. त्यामुळे आम्ही त्यांना सतत स्मित डोळे उघडे ठेवा, तुमच्या मुलांबाबत विचार करा, असं सांगत होतो. जेव्हा स्मित यांच्या शरीराने प्रतिसाद देणं बंद केलं तेव्हा आम्ही त्यांचे दोन्ही पाय उचलले. त्यांच्या मेंदू आणि हृदयाला रक्तपुरवठा होण्यासाठी ही शक्कल लढवली. त्यामुळे त्यांच्या पल्स सुरू झाल्या, असंही ते म्हणाले.
घाबरू नका, आता लँड होणार आहे
विमानातून बाहेर पडण्यासाठीच्या चिंचोळ्या जातेगत बसून मुसायेव हे स्मित यांना एमर्जन्सी मदत देत होते. त्यांना शुद्धीत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मी त्यांना म्हटलं, कॅप्टन, कृपया तुम्ही झोपू नका. आम्हाला तुमची गरज आहे. त्यानंतर मी त्यांना त्यांचं नाव विचारलं. त्यांना किती मुलं आहेत याची माहिती विचारली. मी त्यांना वारंवार प्रश्न विचारून बोलतं करत होतो. तुम्ही घाबरू नका. तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे परत जाणार आहात. आपण लवकरच लँड करणार आहोत, असं त्यांना वारंवार सांगत होतो, असंही मुसायेव यांनी सांगितलं.
दरम्यान, यूएईच्या अटॉर्नी जनरल हमद अल शम्सी यांनी या घटनेची चौकशी सुरू असल्याचं म्हटलं आहे. या घटनेतील को-पायलटने कॉकपीटमध्ये धारदार शस्त्राने स्मित यांच्यावर हल्ला केला. विमान कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विमान सौदीत उतरवण्यात आल्याचं शम्सी यांनी सांगितलं.