
जगात सध्या तणावाचे वातावरण आहे. गेल्या काही काळात अनेक देशांमधील तणाव वाढलेला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. तसेच इराण आणि अमेरिकेतील वाद वाढला आहे, त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये कधीही युद्ध पेटण्याची शक्यता आहे. अशातच आता ग्लोबल फायरपॉवरने 2026 ची सर्वात जास्त लष्करी ताकद असणाऱ्या देशांची यादी जाहीर केली आहे. यात जगभरातील 145 देशांचा समावेश आहे. ही ग्लोबल फायरपॉवर यादी केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर यातून सध्याच्या काळात कोणता देश किती युद्धासाठी किती तयार आहे हे दर्शवते. या यादीत भारताचा दबदबा काय आहे, तर पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेली ग्लोबल फायरपॉवर रँकिंग केवळ सैन्य संख्येवर आधारित नाही. तर ती सैन्याची ताकद, शस्त्रे, हवाई दल, नौदल, बजेट, तंत्रज्ञान, रसद आणि भौगोलिक स्थान यासारख्या 60 हून अधिक घटकांचा विचार करून बनवण्यात आली आहे. हे घटक एकत्रितपणे प्रत्येक देशाला पॉवर इंडेक्स (PwrIndx) स्कोअर देतात. ग्लोबल फायरपॉवरनुसार PwrIndx स्कोअर जितका कमी असेल तितका देशाची पारंपारिक लष्करी क्षमता जास्त आहे असे मानले जाते. 0.0000 हा परिपूर्ण स्कोअर मानला जातो.
जगातील सर्वात शक्तिशाली देश हा अमेरिका आहे. अमेरिकेचा PwrIndx स्कोअर 0.0741 आहे. हा देश 2005 पासून सातत्याने प्रथम क्रमांकावर आहे. जगातील सर्वात मोठे संरक्षण बजेट, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक लष्करी उपस्थिती यामुळे अमेरिका आघाडीवर आहे. अमेरिकेनंतर, रशिया दुसऱ्या स्थानावर आहे, तर चीन तिसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही देशांची क्रमवारी गेल्या वर्षीसारखीच आहे. युक्रेनसोबत युद्ध सुरू असूनही रशियाची लष्करी क्षमता कमी झालेली नाही.
भारताने या यादीत टॉप 5 मध्ये आपले स्थान मिळवले आहे. भारताचा PwrIndx स्कोअर: 0.1346 असून भारत चौथ्या क्रमांकावर आहे. दक्षिण कोरिया भारताच्या पाठोपाठ पाचव्या क्रमांकावर आहे. टॉप 5 मध्ये तीन आशियाई देशांचा समावेश आहे, याचा अर्थ आशियातील देशांची ताकद वेगाने वाढत आहे. या यादीत फ्रान्स सहाव्या स्थानावर आहे. जपान सातव्या स्थानावर आहे. ब्रिटन आठव्या स्थानावर घसरला आहे. तुर्कीये नवव्या स्थानावर आहे, तर इटली दहाव्या स्थानावर आहे.
ग्लोबल फायरपॉवरनुसार पाकिस्तानची घसरण झाली आहे. 2024 मध्ये पाकिस्तान 9 व्या क्रमांकावर, 2025 मध्ये 12 व्या क्रमांकावर आणि आता 2026 मध्ये 14 व्या क्रमांकावर घसरला आहे. पाकिस्तानचा PwrIndx: 0.2626 आहे. याचाच अर्थ भारताला धकमी देणाऱ्या पाकिस्तानची ताकद कमी होताना दिसत आहे.