Explainer : आता नेपाळचं व्हायरल घर, तेव्हा केदारनाथचं मंदीर, महाप्रलयात दोघेही शाबूत कसे? वाचा A टू Z
महापूर झेलूनही शाबूत राहिलेलं हे घर रेनफोर्स्ड कॉक्रिंट फ्रेम अर्थात आरसीसीनं बांधलेलं आहे. एरव्ही हिमालय पट्ट्यात बहुतांश घरं दगडी असतात ज्यामुळे डोंगरावरुन दरड किंवा तत्सम संकटाला तोंड देता यावं.

Japan Flash Floods Viral Home : नेपाळच्या महाप्रलयात अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली. एका क्षणात आलेल्या महापुरामुळे होत्याचं नव्हतं झालं. पाहता पाहता रस्ते, रुग्णालयं, शाळा यांच्यात पाणी, चिखल, गाळ जमा झाला. अनेक इमारती तर चिखलाखाली गडप झाल्या. या महाप्रलयात हजारो लोक चिखलाखाली दडून गेली आहेत. सापडलेल्या मृतदेहांचीही स्थितीही पाहता न येणारी आहे. अनेक लोकांनी आयुष्यभराची कमाई घरात लावून राहण्यासाठी निवारा उभा केला. परंतु हेच निवारे पाण्याखाली गेले. नेपाळच्या या पुराने शेकडो घरं गिळंकृत केली. पण एवढा मोठा पाण्याचा लोंढा असूनही एक घर मात्र मोठ्या दिमाखात उभं राहिलं. या महापुरात या घराच्या भींती अजूनही शाबूत आहेत. म्हणूनच हे घर नेमकं कोणतं आहे? या घरामध्ये असं नेमकं काय आहे? ज्यामुळे ते महापुरात पडलं नाही, असं विचारलं जातंय.
४ ते ५ सदस्यांनी पुरानंतर छताचा आसरा घेतला
नेपाळच्या महाप्रलयात अनेक इमारती-घरं जमीनदोस्त झाली. पण हे एक घर तब्बल अडीच तास पुराच्या तडाख्यात सापडूनही शाबूत राहिलं. नेमकं या घरात असं काय होतं, आजूबाजूची घरं काही मिनिटातच कोसळूनही हे घर कसं तग धरुन राहिलं, याबद्दल जगभर चर्चा सुरू आहेत. या घराचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. घरातल्या जवळपास ४ ते ५ सदस्यांनी पुरानंतर छताचा आसरा घेतला. जवळपास अडीत तास ते डोळ्यांसमोर मृत्यू पाहत होते. आजूबाजूचे शेजारी आणि पूर्ण गल्लीच डोळ्यासमोर वाहून गेली. पण घरानं साथ दिली आणि पूर ओसरल्यानंतर सर्वांना हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू करण्यात आलं. पुरामध्ये ह्या घरातल्या खालच्या मजल्यात पाणी साचून दरवाजे खिडक्या तुटल्या, पण मुख्य ढाचा शाबूत राहिला.
खांब आणि पाया एकमेकांशी स्टिल रिबारनं जोडले होते
महापूर झेलूनही शाबूत राहिलेलं हे घर रेनफोर्स्ड कॉक्रिंट फ्रेम अर्थात आरसीसीनं बांधलेलं आहे. एरव्ही हिमालय पट्ट्यात बहुतांश घरं दगडी असतात ज्यामुळे डोंगरावरुन दरड किंवा तत्सम संकटाला तोंड देता यावं. मात्र अशा प्रलयकारी पुरात पाण्याचा दाब माती वाहून नेत असल्यामुळे दगडी बांधकामंही कोसळतात. घराचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्या घराचे खांब आणि पाया एकमेकांशी स्टिल रिबारनं जोडले होते. ज्यामुळे प्रचंड पाण्याचा दाब फक्त भिंतीवर न पडता
तो फ्रेमद्वारे जमिनीत ढकलला गेला. म्हणून तयार झालेली कॉक्रिंटची मजूबत फ्रेम पुरापुढे टिकू शकली. एक जमेची बाजू म्हणजे महापुराचा जो मुख्य भाग होता त्यापासून हे घर काहीसं बाजूला आणि उंचावर होतं. त्यामुळे घराखालची माती अचानक खचून गेली नाही.
केदारनाथ मंदिरही राहिलं होतं शाबूत
दरम्यान, 2013 साली केदारनाथमधल्या महापुरात मोठा विध्वंस घडूनही केदारनाथ मंदिर शाबूत राहिलं. केदारनाथ मंदिर दगडाचं आणि नेपाळमधलं हे घर आरसीसी असलं, तरी दोघांमध्ये अनेक समान दुवेही आहेत. ज्याप्रमाणे या घराचे खांब हे पायाशी एका फ्रेममध्ये काँक्रीटनं बांधले गेले आहेत, त्याचप्रमाणे केदारनाथ मंदिराचे दगडदेखील एका मजबूत इंटरलॉकिंग सिस्टिमनं एकमेकांशी घट्ट जोडले गेलेयत. दोन्ही प्रकरणांत आसपासचे सर्व काही उद्ध्वस्त झाले, पण मुख्य संरचना टिकली. म्हणूनच घर असावं तर असं म्हणून हे नेपाळचं हे घर जगभर चर्चेत आलंय….