डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमलेले नवे राजदूत सर्जियो गोर किती शक्तिशाली? भारतासाठी चिंता की दिलासा, पुढील…

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे सर्वात विश्वासू सहकारी सर्जियो गोर यांची भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. गोर हे भारतासाठी फायदेशीर ठरतील की चिंता वाढवतील? याबाबत माहिती जाणून घेऊयात.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमलेले नवे राजदूत सर्जियो गोर किती शक्तिशाली? भारतासाठी चिंता की दिलासा, पुढील...
Sergio Gor
| Updated on: Aug 23, 2025 | 3:23 PM

गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिकेतील संबंध बिघडले आहेत. कारण अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लावला आहे. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे सर्वात विश्वासू सहकारी सर्जियो गोर यांची भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. मात्र या नियुक्तीला अद्याप अमेरिकन सिनेटने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे ते सध्यातरी पदभार स्वीकारणार नाही. मात्र त्यांच्या नियुक्तीला मान्यता मिळाल्यानंतर ते भारतासाठी फायदेशीर ठरतील की चिंता वाढवतील याबाबत माहिती जाणून घेऊयात.

भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणलेले असताना सर्जियो गोर हे यांना राजदूत बनवले जात आहे. महत्वाची बाब म्हणजे पहिल्यांदाच एका अमेरिकन राजदूताला भारतात विशेष दूताची जबाबदारी देण्यात आली आहे. ते भारतासह संपूर्ण दक्षिण आणि मध्य आशियावरही नजर ठेवणार आहेत. त्यामुळे सर्जियो गोर यांना काही विशेषाधिकार मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली राजदूत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्जियो गोर हे पाकिस्तानवरही नजर ठेवणार

सर्जियो गोर यांच्या नियुक्तीबाबत बोलताना भारताचे माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांनी सोशल मीडियापोस्टमध्ये म्हटले की, ‘गोर यांना दुहेरी भूमिका देण्यात आली आहे. याचा अर्थ असा आहे की ते केवळ भारतच नाही तर पाकिस्तानसह इतरही देशांचे अमेरिकेसोबत असलेल्या संबंधांवर लक्ष ठेवणार आहेत. यामुळे अमेरिका भारताबाबत जो काही निर्णय घेईल, ते इतर देशांसोबतही शेअर केले जाणार आहे.

भारताची चिंता का वाढली?

भारताचे माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांनी पुढे म्हटले की, ‘ यामुळे भारताची चिंता वाढली आहे. कारण भारताने भारत पाकिस्तानसाठी एकच अधिकारी असल्याच्या निर्णयाचा विरोध केलेला आहे. 2009 मध्ये अमेरिकेने रिचर्ड हॉलब्रुक यांना भारत-पाकसाठी विशेष दूत बनवण्यात आले होते, त्यावेळी तेव्हा भारताने स्पष्टपणे नकार दिला होता. मात्र यावेळी भारतात बसलेल्या अमेरिकेच्या राजदूताला अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे, त्यामुळे यावर आक्षेप घेणे कठीण झाले आहे. याचा परिणाम इंडो-पॅसिफिक संबंधांवर होणार आहे. एकंदरीत गोर हे भारतासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

सर्जियो गोर हे नेमके कोण आहेत?

अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांचा जन्म उझबेकिस्तानमध्ये म्हणजेच तत्कालिन सोव्हिएत युनियनमध्ये झाला होता. कालांतराने त्यांचे कुटुंब माल्टा येथे स्थायिक झाले. गोर यांनी अमेरिकेत शिक्षण घेतले आणि नंतर रिपब्लिकन पक्षाच्या राजकारणात प्रवेश केला. त्यांनी सिनेटर रँड पॉल यांच्यासोबत काम केले आहे. तसेच पक्षासाठी निधी संकलित केला. ट्रम्प आणि गोर बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत आहेत. आता सिनेटची मान्यता मिळाल्यानंतर ते भारतातील पदभार स्वीकारणार आहेत.