घरात घुसून मारलं, भारताच्या ऑपरेशन सिंदूरला जगाचा पाठिंबा का? प्रत्येक भारतीयांना हे माहीत हवं!

पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत अतिरेक्यांचं कंबरडं मोडलं आहे. पाकिस्तानी सीमा न ओलांडता, अतिरेक्यांच्या ठिकाणांवर अचूक निशाणा साधून भारताने अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केली आहेत. या कारवाईला जगभरातील अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे. यूके, फ्रान्स, इस्रायल, नेदरलँड आणि यूएस सारख्या देशांनी भारताच्या कारवाईचं समर्थन केले आहे.

घरात घुसून मारलं, भारताच्या ऑपरेशन सिंदूरला जगाचा पाठिंबा का? प्रत्येक भारतीयांना हे माहीत हवं!
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 08, 2025 | 12:37 PM

अतिरेक्यांनी पहलगाममध्ये हल्ला केल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. या ऑपरेशनद्वारे भारताने अतिरेक्यांची तळं उद्ध्वस्त केली. पाकिस्तानमध्ये शिरकाव न करता, आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता अचूक नेम साधत भारताने अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर निशाणा साधला. विशेष म्हणजे भारताने या फक्त अतिरेक्यांच्या अड्ड्यांना टार्गेट केलं. भारताने पाकिस्तानी नागरिकांच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. तसेच पाकिस्तानी सैन्यावरही हल्ला केला नाही. त्यामुळे भारताच्या या कौशल्याचं जगभरात कौतुक होत आहे. याच कारणामुळे जग भारताच्या पाठी उभं राहिलं आहे.

साधारणपणे अण्वस्त्रधारी देशांच्या दरम्यान सीमेपार एखादी मोठी कारवाई होते तेव्हा दोन्ही देशातील तणाव दूर करण्यासाठी आवाहन करण्यात येणं स्वाभाविक आहे. पण भारताची जगासोबतची होत असलेली घट्ट मैत्री आणि पाकिस्तानी दहशतवादाची जगाची वाढलेली समज यामुळे पाश्चात्य देशांनी भारताला पाठबळ दिलं आहे. म्हणूनच जगातील विविध बलाढ्य देशांनी भारताच्या कारवाईचं समर्थन करणारं स्टेटमेंट जारी केलं आहे. कोणी काय काय म्हटलं आणि भारताचं कसं बळ वाढवलं यावर टाकलेला हा प्रकाश.

युके :

22 एप्रिल रोजी झालेल्या भयानक हल्ल्यानंतर भारताकडून संताप व्यक्त होणं स्वाभाविक आहे. पाकिस्तानने आपल्या हद्दीतील दहशतवादी कारवायांना लगाम घालण्यासाठी अधिक उपयायोजना करणं आवश्यक आहे, असं यूकेच्या परराष्ट्र मंत्र्याने म्हटलं आहे.

यूकेचे खासदार ऋषी सुनक यांनी भारताने दहशतवाद्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर केलेल्या हल्ल्याला पाठिंबा दर्शवला आहे. कोणत्याही राष्ट्राने दुसऱ्या देशातून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना स्वीकारावे, असे होऊ शकत नाही, असं सुनक यांनी म्हटलं आहे.

यूकेच्या खासदार प्रीती पटेल यांनी देखील या हल्ल्याला पाठिंबा दिला आहे. भारताला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि त्याला धोका निर्माण करणाऱ्या घृणास्पद दहशतवादी पायाभूत सुविधांचा नायनाट करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं प्रीती पटेल यांनी म्हटलंय.

फ्रान्स :

भारताने स्वसंरक्षणासाठी केलेला हल्ला समजू शकतो, असं फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्याने म्हटलं आहे. फ्रान्सने एक निवेदन जारी करून 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला होता. तसेच भारतासोबत संपूर्ण ताकदीने उभे असल्यांच फ्रान्सच्या निवेदनात म्हटलं आहे. दहशतवादा विरुद्धच्या लढाईत फ्रान्स भारतासोबत असल्याचंही या निवेदनात म्हटलं आहे.

इस्रायल :

इस्रायलच्या दूतावासानेही भारताच्या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचं आम्ही समर्थनच करतो. निष्पापांविरुद्धच्या तुमचे क्रूर कृत्यांपासून लपण्यासाठी तुम्हाला कोणतीही जागा नाहीये हे आता दहशतवाद्यांना कळलं पाहिजे, असं इस्रायलच्या राजदूताने म्हटलं आहे.

नेदरलँड :

नेदरलँडचे खासदार गीर्ट विल्डर्स यांनी भारताला पाठिंबा दिला आहे. गीर्ट यांनी एक ट्विट करून काश्मिरात 100 टक्के भारतीय असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये #PakistanBehindPahalgam हा हॅशटॅगही वापरला आहे.

यूएस :

काँग्रेसचे खासदार थानेदार यांनी म्हटले की, दहशतवाद सहन केला जाऊ शकत नाही आणि तो दंडमुक्त राहू शकत नाही. भारताला आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी दहशतवादी नेटवर्कचा नायनाट करण्याच्या भारताच्या प्रयत्नांप्रती ठाम एकजूट व्यक्त केली.

पनामा :

या दु:खद घटनेत आणि दहशतवादाविरोधातील सुरू असलेल्या लढ्यात पनामा प्रजासत्ताक भारतासोबत ठामपणे उभी आहे, असं पनामाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.