
अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढलेला असताना आता देशाच्या दक्षिणेकडील बंदर अब्बास शहरात भीषण स्फोट झाले आहेत. इराणी सरकारी माध्यमांनुसार, हा स्फोट एका बहुमजली इमारतीत झाला. या स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणच्या अमेरिकन लष्कराच्या हालचाली वाढलेल्या असताना हा स्फोट झाला आहे. त्यामुळे आता इराणी सरकारची चिंता वाढली आहे. हे ड्रोन हल्ले असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे, मात्र इस्रायलने या हल्ल्यात आमचा सहभाग नाही अशी माहिती दिली आहे.
इराणच्या सरकारी टेलिव्हिजन चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार बंदर अब्बासमधील मोआलेम बुलेव्हार्डवर असलेल्या आठ मजली इमारतीत भीषण हा स्फोट झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की इमारतीचे दोन मजले पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. तसेच अनेक वाहनांचे नुकसान झाले आणि जवळच्या दुकानांचेही नुकसान झाले. स्थानिकांच्या मते, स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला, ज्यामुळे परिसरात घबराट पसरली.
बंदर अब्बास शहरातील या स्फोटानंतर मदत आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांनी ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांचा शोध सुरू केला आहे. स्फोटानंतर या ठिकाणी आग लागली होती, या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तसेच अनेकजण या हल्ल्यात जखमी झाल्याचेही समोर आले आहे.
इराणी रिव्होल्यूशनरी गार्डच्या नौदल कमांडरला या स्फोटात लक्ष्य करण्यात आल्याचे समोर आले आहे. आता इराणी लष्करप्रमुख अमीर हतामी यांनी देशाच्या सुरक्षेबाबत कठोर विधान जारी केले. इराणी सैन्य पूर्णपणे सतर्क आहे आणि कोणत्याही संभाव्य हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे असं हतामी यांनी म्हटले आहे. अमेरिकेने आखाती प्रदेशात आपले लष्कर तैणात केल्याच्या वेळी हे स्फोट झाले आहेत.
बंदर अब्बास हे इराणमधील एक महत्त्वाचे बंदर शहर आहे आणि ते धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. येथील स्फोटामुळे केवळ स्थानिक प्रशासनातच नव्हे तर देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती समोर आली आहे.