हेमा मालिनी नाही तर ही अभिनेत्री होती धर्मेंद्र यांची पहिली क्रश, 40 वेळा पाहिला एकच चित्रपट
हेमा मालिनी नाही तर ही अभिनेत्री होती धर्मेंद्र यांची पहिली क्रश. तिचा एक चित्रपट 40 वेळा पाहिला. अभिनेत्री त्यांना फोन करून गायची गाणी.

Dharmendra : बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांच्या आयुष्यातील पहिल्या क्रश कोण होत्या असा प्रश्न पडला तर अनेकांच्या मनात लगेच हेमा मालिनी यांचे नाव येते. मात्र हे उत्तर पूर्णपणे चुकीचे आहे. धर्मेंद्र यांचे पहिले प्रेम आणि पहिले आकर्षण होती बॉलिवूडची पहिली सिंगिंग सुपरस्टार अभिनेत्री सुरैया. आज 31 जानेवारी रोजी सुरैयांची 22 वी पुण्यतिथी असून त्या निमित्ताने त्यांच्या आठवणी पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात ताज्या झाल्या आहेत.
15 जून 1929 रोजी जन्मलेल्या सुरैया जमाल शेख यांचे 31 जानेवारी 2004 रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्यानंतरही त्यांची गाणी, अभिनय आणि व्यक्तिमत्त्व आजही लाखो चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. सोशल मीडियावर सध्या सुरैयांचे जुने फोटो, किस्से आणि आठवणी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यातच एक खास फोटो चर्चेचा विषय ठरत आहे, जो धर्मेंद्र यांच्या सुरैयावरील प्रेमाची साक्ष देतो.
या फोटोमध्ये सुरैया आणि धर्मेंद्र एकमेकांकडे हसत पाहताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हा फोटो सुरैयांनी स्वतः साइन करून दिला होता. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले होते ‘माय फेवरेट फॅन धर्मेंद्र’ यातून सुरैयांचे मोठेपण आणि साधेपण दिसून येतो. त्या काळात सुपरस्टार असतानाही त्यांनी एका नवख्या कलाकाराला दिलेला हा सन्मान आजही लोकांना भावतो.
धर्मेंद्र यांनी अनेक मुलाखतींमध्ये कबूल केले आहे की सुरैया याच त्यांच्या पहिल्या क्रश होत्या. ते सुरैयांच्या ‘दिल्लगी’ या चित्रपटाचे प्रचंड चाहते होते. विशेष म्हणजे हा चित्रपट त्यांनी तब्बल 40 वेळा पाहिला होता. काही वेळा थिएटरपर्यंत पोहोचण्यासाठी ते मैलोनमैल पायी चालत जात असत. सुरैयांचे सौंदर्य, अभिनय आणि खासकरून त्यांची मधुर गायकी धर्मेंद्र यांना इतकी भुरळ घालत होती की, त्यांच्यामुळेच आपण चित्रपटसृष्टीत आलो असे धर्मेंद्र यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
धर्मेंद्र यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते, ‘मी सुरैया जींचा मोठा चाहता होतो. जेव्हा त्यांना कळले की मी त्यांचा फॅन आहे, तेव्हा त्यांनी मला फोन करून स्वतः काही गाणी गायली. हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे.’ एका चाहत्यासाठी सुपरस्टारने फोनवर गाणी गाणे ही त्या काळातही फार मोठी गोष्ट मानली जायची.
सुरैया या बॉलिवूडमधील पहिल्या सिंगिंग सुपरस्टार होत्या. 1940 आणि 1950 च्या दशकात त्यांनी ‘अनमोल घडी’, ‘मिर्झा गालिब’, ‘दिल्लगी’, ‘शमा’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच स्वतः गाणी गायली. त्यांची गायकी, उर्दूवरची पकड आणि नजाकत यामुळे त्या प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या.
