
बंगालमध्ये बाबरच्या नावावर जोरात राजकारण सुरु आहे. मुर्शिदाबाद बंगालच्या राजकारणाचं सेंटर आहे. मुर्शिदाबादमध्ये ज्या ठिकाणी बाबरी मशिदीचा पाया रचला, तिथे जुमेच्या नमाजसाठी हजारो लोक पोहोचले. या मशिदीसाठी वीट रचणारे तृणमुल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायूं कबीरही तिथे उपस्थित होते. देशातील वेगवेगळ्या राज्यातील नेत्यांनी बाबरच्या नावावर बनवल्या जाणाऱ्या या मशिदीवर नाराजी व्यक्त केली आहे. आता बागेश्वर बाबा नावाने प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी बाबरी मशिदीच्या निर्माणावरुन इशारा दिला आहे.
“या देशात बाबरी मशीद पुन्हा बनवण्याचा प्रयत्न होत आहे, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. बाबरच्या नावावर भारतात कुठेही स्थान बनलं तर हिंदू 1992 मध्ये जे झालं ते करण्यासाठी पुन्हा तयार होतील.हे हिंदूंविरोधात परदेशी कारस्थान आहे. बंगालपासून काश्मीर पर्यंत हिंदुंविरोधात बोलणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल. बाबरी बनेल तर बाबा येणारचं” असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले. “धार्मिक उन्माद पसरवण्याचा विचार केला जातो आहे. देशात कुणाच्या धर्माविरोधात बोलू नये” असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले. “मी मध्यंतरी 150 किलोमीटरची पदयात्रा केली होती. भविष्यात भारत हिंदुराष्ट्र बनणारचं आहे. सनातनी संस्कृती मानणारे लोक आहेत” असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका मुस्लिम महिलेचा हिजाब ओढला, त्यावर धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, ‘हे योग्य नव्हतं, राजकीय व्यक्तीच त्यावर अधिक बोलू शकतील’
महायुतीला मोठा फायदा झाला होता
मुंबईच्या अंधेरी पूर्वेत सेरे पंजाब कॉलनी परिसरामध्ये बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे मुंबईत प्रथमच तीन दिवसीय दिव्य दरबार व कथा कथन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या माध्यमातून अंधेरीत वीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला मोठं महत्त्व आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मीरा रोड परिसरात धिरेंद्र शास्त्री महाराज यांच्या कार्यक्रमामुळे महायुतीला मोठा फायदा झाला होता.
त्याच पार्श्वभूमीवर महावीर हनुमानांच्या भक्ती व शौर्यावर आधारित प्रेरणादायी जीवनदृष्टी घेऊन पूज्य बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री जी हे मुंबईत प्रथमच भव्य कथा-कथन व दिव्य दरबारासाठी येणार आहेत. हा ऐतिहासिक धार्मिक सोहळा आज पासून ते 21 डिसेंबर 2025 पर्यंत होईल.