इम्रान खान यांच्या बहिणींना झोपेतच उचललं; दरवाजा तोडून बेडरूमपर्यंत… पाकिस्तानात पुन्हा भडका उडणार
पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या तीन बहिणींना पोलिसांनी घरातून अटक केली आहे. दरवाजा तोडून बेडरूममध्ये घुसून ही कारवाई करण्यात आली. पीटीआयने 27 सप्टेंबर रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिल्याने, त्यापूर्वीच पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता वाढली असून, मोठ्या संघर्षाची शक्यता वर्तवली जात आहे.

पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा भडका उडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तिन्ही बहिणींना पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान खान यांची बहीण झोपलेली असतानाच दरवाजा तोडून पोलीस बेडरूमपर्यंत गेले आणि त्यांना अटक केली. लाहोर पोलिसांनी आधी अलीमा यांना अटक केली. त्यानंतर डॉ. उजमा खान आणि नौरीन नियाजी यांना अटक केली आहे. येत्या 27 सप्टेंबर रोजी पाकिस्तानात इमरान खान यांच्या पक्षाने मोठं आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वीच पोलिसांनी तिघींना अटक केल्याने पाकिस्तानात मोठा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे प्रवक्ते शेख वकास अकरम यांनी ट्विटरवर याची माहिती दिली आहे. एका गाडीत इम्रान खान यांच्या बहिणींना डांबून त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आलं आहे. महिलांनाच नव्हे तर मुलांनाही अटक करण्यात आली आहे, असं शेख वकास अकरम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. इम्रान खान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दाव्यानुसार, पोलिसांनी इम्रान यांच्या संपूर्ण कुटुंबालाच अटक केली आहे.
रविवारीच आदेश निघाले
लाहोरच्या डेप्यु कमिशनरने रविवारी पंजाब प्रांताच्या मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर कायद्याच्या अंतर्गत या तीन बहिणींना 30 दिवस ताब्यात ठेवण्याचे दोन वेगवेगळे आदेश काढले होते. इम्रान खान यांच्या तिन्ही बहिणींना अटक करण्याची प्रक्रिया अत्यंत धक्कादायक होती. डॉन या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, पोलिसांनी घरात जबरदस्तीने घुसून इम्रान खान यांच्या बहिणींना आणि त्यांच्या मुलांना गाडीमध्ये बसवलं. अधिकारी कुणाचं काही ऐकत नव्हते, असा आरोप इम्रान खान यांचा मुलगा कासिम खान याने लगावला आहे.
बेडवर झोपलेल्या असतानाच…
पत्रकार मारियो नवाफल यांनी फायनान्शियल टाइम्सच्या हवाल्याने एक दावा केला आहे. इम्रान खान यांच्या घरी 200 हून अधिक पोलीस अधिकारी आले होते. त्यांनी लाहोर येथील इम्रान खान यांच्या बहिणींच्या घरी छापा मारला. त्यानंतर या पोलिस घराचा दरवाजा तोडून बेडरूमपर्यंत गेले. इम्रान खान यांची बहीण डॉ. उजमा खान या बेडवर झोपलेल्या होत्या. त्या झोपेत असतानाच त्यांना अटक केली आहे, असं नवाफल यांनी म्हटलं आहे.
दोन्ही घरातील कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या क्वॉर्टरमधून खेचून बाहेर आणण्यात आलं. अलीमा खान यांच्या स्टाफला पोलिसांनी व्हॅनमध्ये डांबलं. तसेच पोलिसांनी इतर लोकांनाही अटक करण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
30 दिवस तुरुंगातच
नरीन नियाजी आणि डॉ. उजमा यांना मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर ऑर्डिनन्सच्या अंतर्गत 30 दिवसासाठी अटक करण्यात आली आहे. त्यांना कोट लखपत तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. सार्वजनिक शांततेसाठी इम्रानच्या बहिणी धोका असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. विशेष म्हणजे इम्रान खान यांच्या बहिणींचा राजकारणाशी सुतरामही संबंध नाहीये.
27 सप्टेंबरला भडका उडणार
पाकिस्तानमध्ये येत्या 27 सप्टेंबरला मोठा भडका उडणार आहे. इम्रान खान यांची सुटका व्हावी म्हणून पीटीआयने 27 सप्टेंबर रोजी देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने 27 तारखेला इस्लामाबादमध्ये मोठा मार्च काढला जाणार आहे. हा मार्च हाणून पाडण्यासाठी पोलिसांनी खान यांच्या तिन्ही बहिणींना अटक केली आहे. तर मार्च रोखण्यासाठी हजारो पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.
आमचं कुटुंब नजरकैदेत
इम्रान खान यांचे भाचे शेरशाह खान यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. आमचं संपूर्ण खानदान नजरकैदेत आहे. आमच्या घरांना घेरलं आहे. घरासमोरच्या दोन्ही गल्ल्या बंद करण्यात आल्या आहेत. माझी आई अलीमा यांचं काही वेळापूर्वी अपहरण करण्यात आलं आहे. तिची कोणतीच माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही. तिला कुठे ठेवलंय तेही सांगितलं जात नाहीये. तिच्या बाबतची माहिती लपवून ठेवणं योग्य नाही. हा खरा तर सरकारचा भेदरटपणा आहे. राजकीय आणि सैन्य सरकारचा चेहरा असाच असतो, असं शेरशाह यांनी म्हटलं आहे.