शरद पवार एनडीएसोबत जाणार? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर काय?
हा डेडलॉक नाही. तो त्यांनी निर्माण केलाय. फक्त हसन मुश्रीफ आणि महाडिक यांच्यासाठी हे सुरू आहे. ही संस्था गुजरातच्या घशात घालण्याचं काम सुरू आहे. गोकुळ अमूलच्या घशात जाऊ नये म्हणून हे मतदान आहे. फडणवीस, महाडिक आणि मुश्रीफ यांना गोकुळ अमूलच्या घशात घालायचं आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन केला होता. यावेळी त्यांनी पवारांना आराम करण्याचा सल्ला दिला असून सुप्रिया सुळे आणि आम्ही देश सांभाळू असं म्हटलं आहे. त्यानंतर लगेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पवारांची भेट घेऊन विचारपूस केली. दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध वावड्या उठल्या आहेत. पवार एनडीएसोबत जाण्याची पुन्हा चर्चा रंगली आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. शरद पवार कुठेच जाणार नाहीत. ते आमच्यासोबतच राहतील, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
शरद पवार कुठे जाणार नाहीत. मी खात्रीने सांगतो. प्रफुल्ल पटेल यांना काही म्हणू द्या. पवार कुठे जाणार नाहीत. ते आमच्यासोबतच राहतील. पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्त्व त्यांनी केलं आहे. कुणी गमजा मारत असतील तर त्या खोट्या आहेत. ते आमच्यासोबत राहतील आणि आम्हाला आशीर्वाद देत राहतील, असं संजय राऊत म्हणाले.
सोमय्यांनी उडी मारावी
ईडीने राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना क्लिनचिट दिली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आता किरीट सोमय्यांनी अटल सेतूवरून उडी मारावी. फडणवीस यांनी त्यांचं थोबाड फोडलं आहे. सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्या दारात उपोषणाला बसावं. ईडीच्या दारात बसावं. ज्यांच्या ज्यांच्या विरोधात ईडीचे खटले केले, आंदोलन केले ते सर्व भाजपमध्ये गेले आहेत. भाजपने त्यांना क्लिनचिट दिली आहे. त्यांच्यापुढे एकच काम आहे. त्यांनी या नेत्यांच्या दारात जाऊन उपोषण करावं. मी सोमय्याचा फोटो पाहिला. त्यांचा चेहरा काळा पडला आहे. दात पडले आहेत. भाजपने आता हसन मुश्रीफ यांचा फोटो लावावा. हसन मुश्रीफ यांच्या नावाचं एक पदक भाजपने सोमय्यांच्या छातीवर लावावं, असा हल्लाच राऊत यांनी चढवला.
तर तुम्ही कोणता निर्णय दिला असता?
गोकुळच्या मुद्दयावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. गोकुळच्या बैठकीला 14 चा कोरम लागतो. पण लोकांनी कौल दिला आहे. तो कोरम पूर्ण होऊ नये म्हणून फडणवीस यांनी समविचारी पॅनलच्या दोन जागा चोरल्या आहेत. शेवटच्या क्षणी पाच सहा मताने निर्णय फिरवले गेले. समजा महाडिकांच्या पॅनलला 13 जागा मिळाल्या असत्या आणि सतेज पाटलांना 12 जागा मिळाल्या असत्या, तर हा निर्णय घेतला असता का? पाच सदस्य नेमण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला असता का? तेव्हा बहुमत आहे असं फडणवीस यांनी म्हटलं असतं. पण तुम्ही पराभूत झाला. तुमचं पॅनल पराभूत झाले. लोकांनी तुम्हाला पराभूत केलं आहे. तुम्ही त्यांना शासकीय सदस्य म्हणून घेता हा काय प्रकार आहे. फडणवीस यांनी आपल्या प्रतिमेला अधिक डागााळू देऊ नये. त्यांची प्रतिमा खूप डागाळली आहे. इतकी काळीकुट्ट करू नये की लोकांनी तुम्हाला ओळखूच नव्हे, अशी टीका त्यांनी केली.
मला शंका यायला लागलीय
लोकशाहीची चाड असेल, जनमताची चाड असेल तर राज्यपाल त्या अध्यादेशावर सही करणार नाहीत. सध्याच्या राज्यकर्त्यांनी लाज, लज्जा, शरम याची कोणतीच फिकीर न करता जनमताचा कौल फेटाळून लावला आहे. लोकशाही धोक्यात आहे हे यासाठीच आम्ही म्हणतोय. फडणवीस इतक्या खालच्या थरावर जातील याची कल्पना नव्हती. चंद्रकांत पाटलांचं समजू शकतो. पण फडणवीस यांच्या वडिलांनी आणीबाणीच्या विरोधातील संघर्षात भाग घेतला असा ते दावा करतात. आता मला त्यावरच शंका यायला लागली आहे. गंगाधर फडणवीस हे लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी लढत असतील तर त्यांचे चिरंजीव फडणवीस हे लोकशाहीने दिलेला कौल चिरडून टाकू शकत नाही. हा त्यांच्या वडिलांच्या संघर्षाचा आणि त्यागाचा अपमान ठरेल, असं ते म्हणाले.
