Rohit Pawar : ‘..तर मग ते मला योग्य वाटत नाही’, प्रफुल पटेल-शरद पवार भेटीवर रोहित पवारांची सूचक प्रतिक्रिया
Rohit Pawar : शरद पवार सध्या आजारी आहेत. काल प्रफुल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रफुल पटेल दबावाचं राजकारण करत असल्याची चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर आल्यापासून वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. प्रफुल पटेल हे पक्षांतर्गत दबावाचं राजकारण करतायत असं बोललं जातय. त्यावर रोहित पवार बोललेत. “पवारसाहेबांना अनेक लोकांनी फोन केले. त्यात पंतप्रधान साहेबांनी इतर नेत्यांनी सुद्धा फोन केले. याआधी सुद्धा वाढदिवस असू द्या, तब्येत खालावलेली असताना पवारसाहेबांची विचारपूस करण्यासाठी फोन केले. पवारसाहेब देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्या फोनमध्ये वेगळं काही राजकारण दडलेलं आहे असं वाटतं नाही” असं रोहित पवार बोलले.
“इथे रुग्णालयात असताना काँग्रेसचे काही आमच्या पक्षातले, कुटुंबातले, विरोधी पक्षातले नेते येऊन भेटले. एखादा व्यक्ती आजारी असताना दुसऱ्या पक्षातले नेते येऊन भेटत असतील तर त्यात काही राजकारण असेल असं मला वाटत नाही. फक्त भेटायला येणाऱ्या लोकांनी त्या भेटीचे फोटो, व्हिडिओचा वापर करुन अंतर्गत राजकारण केलं तर ते मला योग्य वाटत नाही” असं रोहित पवार म्हणाले.
मग तुमच्या कामावर चर्चा करु
“पवारसाहेब हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं असेल जास्त ताण घेऊ नका, बोलू नका. त्यामुळे पवार साहेबांनी त्यांना सांगितलं असेल की माझी तब्येत बरी होऊ द्या, मग तुमच्या कामावर चर्चा करु. नॉर्मल संवाद सोडला तर त्यात काही राजकारण आहे असं मला वाटतं नाही” असं आमदार रोहित पवार म्हणाले.
एक मोठ रॅकेट आहे
बीड पोलीस भरतीमध्ये बोगस प्रमाणपत्राचं रॅकेट उघड करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यावर रोहित पवार म्हणाले की, “त्याने खूप महत्वाचा मुद्दा पुढे आणला. स्पोर्ट्सचे असेल अशी खोटी प्रमाणपत्र दिली जातायत. एक मोठ रॅकेट आहे. ज्याचा मृत्यू झाला ते दुर्देवी आहे” “त्याचा जो लढा अर्धवट आहे, तो पुढे घेऊन जाऊ. अशा गोष्टी महाराष्ट्रात होणार असतील, कुठेतरी एखादी खरी गोष्ट लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न होत असेल त्याला अशा पद्धतीने मारलं जात असेल तर महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था रसातळाला गेली आहे हे बोलू शकतो”
