वारंवार टॉयलेटला जाणे भारी पडले, इंजिनिअरची गेली नोकरी…कोर्टात गेली केस..मग काय घडले ?
कामावर असताना वारंवार टॉयलेटला जाणे एका इंजिनिअरला महागात पडले आहे. आणि त्याला त्याच्या जॉबवर पाणी सोडावे लागले आहे.

नोकरी करताना विविध कारणांनी जॉबवर पाणी सोडावे लागल्याचे तुम्ही आतापर्यंत ऐकले असेल. कामावर काढून टाकण्यात कामचुकारपणा आणि वारंवार दांड्या मारल्याची सवय अशी कारणे बहुतांशी वेळा तुम्ही ऐकलेली असतील. परंतू वारंवार टॉयलेटला जाण्याच्या कारणावरुन एखाद्याला कामावर काढल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का ? परंतू अशी घटना घडली मात्र आहे.
चीनमध्ये एका इंजिनिअरला तो वारंवार आणि दीर्घकाळ टॉयलेटला जातो म्हणून नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने दावा केला होता की त्याला मुळव्याधाचा त्रास आहे. तरीही कंपनीने त्याचे काहीही न ऐकता त्याला नोकरीवरुन काढले. अखेर हे प्रकरण कोर्टात गेले. तेथे त्याला थोडासा दिलासा मिळाला असला तरी त्याचा पूर्ण विजय झाला नाही.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार ली नावाचा हा इंजिनिअर पूर्व चीनमधील जियांगसू प्रांताच्या एका कंपनीत साल २०१० पासून काम करत होता. साल २०१४ मध्ये त्याचे ओपन टर्म कॉन्ट्रक्ट रिन्यू झाले. एप्रिल ते मे २०२४ दरम्यान एका महिन्यात त्याने १४ वेळा बाथरुम ब्रेक घेतले. त्यातील एक ब्रेक सुमारे चार तासांचा होता.
कंपनीने सादर केले सीसीटीव्ही पुरावे
कंपनीने सांगितले की ली याच्यावर महत्वाची जबाबदारी होती. त्यात प्रत्येक वेळी उपलब्ध असणे आणि कामाशी संबंधित संदेशाचा तातडीने उत्तर देणे गरजेचे होते. जेव्हा व्यवस्थापनाने त्याची कामाच्या ठिकाणी अनुपस्थिती पाहिली आणि चॅट ऐपद्वारे त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तर कोणतेही उत्तर मिळाले नाही.
त्यानंतर कंपनीने कोर्टात सीसीटीव्ही फुटेज सादर केले. ज्यात ली वारंवार आणि प्रदीर्घ काळ टॉयलेटला जाताना दिसला. कंपनीच्या नियमानुसार विना अनुपतीशिवाय जास्त वेळ कार्यस्थळ सोडणे अनुपस्थिती मानली गेली आहे. १८० दिवसात तीन दिवसाची गैरहजेरी देखील नोकरी जाण्यासाठी पुरेशी ठरु शकते. कंपनीने लेबर युनियनची परवानगी घेऊन कारवाई केली.
मेडिकल पुराव्यांवर कोर्टाने केले सवाल
ली याने त्याची बाजू मांडताना मे आणि जून २०२४ मध्ये ऑनलाईन खरेदी केलेली मुळव्याधाच्या औषधांच्या बिले आणि जानेवारी २०२५ च्या ऑपरेशनचे हॉस्पिटलचे रेकॉर्ड सादर केले. त्याने दावा केला की आजारामुळे त्याला प्रदीर्घ ब्रेक घ्यावे लागले आणि नोकरीवरुन काढणे बेकायदेशीर आहे. त्याने कोर्टात कंपनीकडून ३ लाख २० हजार युआन ( सुमारे ४५ हजार अमेरिकन डॉलर ) नुकसान भरपाईची मागणी केली.
मात्र, कोर्टाने म्हटले ली याने घेतलेला वेळ हा शारीरिक गरजांपेक्षा खूप जास्त होता. तसेच मेडिकल रेकॉर्ड अनेक ब्रेकनंतरचे आहेत. ली याने आधी त्याच्या आजाराची माहिती कंपनीला दिली नाही. तसेच त्याने आजारी रजेसाठी अर्जही केला नाही, जे कराराचा भंग आहे.
दोन सुनावणी झाल्यानंतर कोर्टाच्या मध्यस्थीने कंपनीला ३० हजार युआन ( सुमारे ४,२०० अमेरिकन डॉलर ) ची मदत देण्यास सांगण्यात आले. यात ली याने कंपनीला दिलेली सेवा आणि बेरोजगारीने त्याला झालेला त्रास याचा विचार करण्यात आला. बातमीनुसार चीनमध्ये आधीही अशी प्रकरणे आली आहे. साल २०२३ मध्ये जियांगसू येथील अन्य एका कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढण्यात आले होते. आणि कोर्टाने कंपनीचा निर्णय योग्य ठरवला होता.
