
सत्तेची चव चाखण्यासाठी ‘इंडिया आऊट’चा नारा देणाऱ्या मालदीवच्या राष्ट्राध्यक्षाने भारताला टार्गेट केलं होतं. पण त्यांच्या या अहंकाराचा त्यांनाच नव्हे तर संपूर्ण मालदीवला फटका बसला. भारतानेही गर्विष्ठ राष्ट्राध्यक्षाचा घमंड जिरवण्यासाठी त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या. दोन्ही देशाचे संबंध बिघडल्याने मालदीवच्या व्यापाराला त्याचा फटका बसला. तिथलं पर्यटन कोलमडलं. केवळ आणि केवळ भारतीय पर्यटकांच्या जीवावर जगणाऱ्या मालदीव काकुळतीला आला. ‘कृपया आमच्या देशात या…’ असं म्हणण्याची वेळ मालदीववर आली.
भारतीय पर्यटकांना विनंती करणारा मालदीवने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांच्या देशात बोलवत आहे. दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. 2023मध्ये सत्तेत आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुयिजू यांनी भारताविरुद्ध मुक्ताफळे उधळली होती. त्यामुळे दोन्ही देशाचे संबंध बिघडले होते. त्याचा फटका मालदीवच्या अर्थव्यवस्थेला बसला होता. त्यामुळे भारताशी संबंध सुधारण्याची मालदीवला परत गरज भासू लागली आहे. त्यामुळेच मोदींच्या मालदीव दौऱ्याला महत्त्व आलं आहे.
भारताशी पंगा घेऊन चीनच्या बाजूने झुकलेल्या मालदीवला आपली चूक कळून चुकली आहे. त्यामुळेच त्यांनी भारताशी संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच राष्ट्राध्यक्ष मुयिजू यांनी भारताला भेट दिली आणि पंतप्रधान मोदी यांना मालदीवच्या भेटीस येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार मोदी मालदीव दौऱ्यावर जाणार असून, ही भेट दोन्ही देशांमध्ये तणावानंतरच्या परिस्थितीत होत असल्याने विशेष महत्त्वाची मानली जाते.
पंतप्रधान मोदी यांचा चार दिवसांचा परदेश दौरा आजपासून सुरू होत आहे. या दौऱ्यात ते युनायटेड किंगडम (UK) आणि मालदीवला भेट देतील. UK ला ही त्यांची चौथी भेट असून, मालदीवला तिसरी आहे. पंतप्रधान मोदी प्रथम UK मध्ये जाऊन तिथे मुक्त व्यापार करारावर सह्या करतील आणि त्यानंतर मालदीवला जातील. 25-26 जुलै रोजी मालदीव दौरा पार पडेल.
60व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य
मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्य दिन समारंभात मोदी “अति महत्त्वाचे पाहुणे” म्हणून सहभागी होणार आहेत. 2023 मध्ये “इंडिया आउट” मोहीम रेटणारे मुयिजू आता स्वतः मोदींना सन्मानाने आपल्या देशात बोलावत आहेत. दोन्ही देशाचे संबंध सुधारण्यास सुरुवात झाल्याचे हे संकेत आहेत.
या भेटीत मोदी आणि मुयिजू अनेक प्रकल्पांचं उद्घाटन करतील. भारत सध्या मालदीवचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. संरक्षण, सागरी सुरक्षेसह विविध क्षेत्रांत दोन्ही देशांचं एकमेकांना सहकार्य सुरू आहे. दोन्ही देश सध्या मुक्त व्यापार करार, गुंतवणूक आणि पुनर्नविकरणीय ऊर्जा, मत्स्य व्यवसाय यांसारख्या क्षेत्रांतील सहकार्यावर चर्चा करत आहेत.
भारताने मालदीवच्या संरक्षण यंत्रणेला प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि विकास प्रकल्पांद्वारे मोठी मदत दिली आहे. संकटाच्या काळात भारताने मालदीवला वेळोवेळी मदत केली आहे, असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केलं.
2024 मध्ये मुयिजू यांनी भारत भेटीत आर्थिक आणि सुरक्षा भागीदारीबाबत संयुक्त दृष्टिकोन स्वीकारला. भारत मालदीवमध्ये विविध क्रेडिट योजनांद्वारे विकास प्रकल्प राबवत आहे. त्यातील प्रमुख म्हणजे “ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट” जो चार बेटांना जोडणार आहे.