
तीन दिवस हिंसाचारात होरपळल्यानंतर नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन झालं आहे. सुशीला कार्की यांन नेपाळची कमान संभाळली आहे. सुशीला कार्की यांनी अंतरिम पंतप्रधानपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर भारताने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये शांतता आणि स्थिरता कायम राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दोन्ही देशातील जनतेच्या भल्यासाठी आम्ही एकत्र मिळून काम करत राहू, असं भारताने म्हटलं आहे. युवकांच्या हिंसक विरोध प्रदर्शनानंतर तत्कालिन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना पदावरुन तात्काळ पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर नेपाळी जनतेने अंतरिम पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की यांची निवड केली आहे.
सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या अंतरिम सरकारच भारताने स्वागत केलं आहे. “आम्ही नेपाळमध्ये सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखालील नव्या अंतरिम सरकार स्थापनेच स्वागत करतो. आम्हाला अपेक्षा आहे की, यामुळे शांतता आणि स्थिरतेला प्रोत्साहन मिळेल” अशी प्रतिक्रिया भारताने दिली आहे. “नेपाळ भारताचा सर्वात जवळचा शेजारी आहे. दीर्घकाळापासून भारताच्या विकासाचा भागीदार राहिला आहे. दोन्ही देशातील जनतेच भलं आणि प्रगतीसाठी नेपाळसोबत मिळून काम करत राहू” असं भारताने म्हटलं आहे.
पंतप्रधान पदाची शपथ दिली
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी सुशीला कार्की यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली. एका औपचारिक समारंभात ही शपथ देण्यात आली. शपथ घेतल्यानंतर सुशीला कार्की या नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान बनल्या आहेत, सोबतच त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. सुशीला कार्की यांनी भारतात सुद्धा शिक्षण घेतलं आहे. भारत-नेपाळ संबंधांबद्दल त्या सकारात्मक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा त्या मानतात. त्यामुळे ओली सरकारमध्ये नेपाळसोबत बिघडलेले संबंध पुन्हा सुधारतील.
नेत्यांना पळवून-पळवून मारलं
नेपाळमध्ये सोशल मिडिया बंदी आणि वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात युवकांनी सरकार विरोधात उग्र प्रदर्शन केलं. या प्रदर्शनात अनेक युवकांचे प्राण गेले. हिंसक आंदोलनादरम्यान माजी मंत्री, नेत्यांना पळवून-पळवून मारण्यात आलं. प्रदर्शन इतक उग्र होतं की, युवकांनी माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जाळलं. इतकच नाही, देशाचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना पदाचा राजीनामा देऊन काठमांडूमधून पळावं लागलं. त्यानंतर सुशीला कार्की यांना देशाचं पंतप्रधान बनवून सत्ता सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.आता कार्की देशाच्या अंतरिम पंतप्रधान आहेत.