India-Srilanka : श्रीलंकेने भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिला मोठा शब्द, काहीही झालं तरी आम्ही…
India-Srilanka : सध्या भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह श्रीलंका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात श्रीलंकेने भारताला एक महत्वाचा शब्द दिला आहे. भारताच्या रणनितीक सुरक्षेच्या दृष्टीने श्रीलंकेने दिलेलं आश्वासन खूप महत्वाचं आहे.

भारत आणि श्रीलंकेमध्ये द्विपक्षीय संबंध दृढ होत चालले आहेत. दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य वाढत आहे. याचा परिणाम हिंद महासागराच्या क्षेत्रीय सुरक्षेवर तसचं भारताच्या समुद्र रणनितीवर होतो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा श्रीलंका दौरा हीच रणनितीक भागीदारी पुढे नेण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे. सर्वात मोठा संदेश श्रीलंकेकडून आला आहे. भारत विरोधी कुठलीही कारवाई करण्यासाठी श्रीलंकन भूमीचा वापर होऊ देणार नाही असं राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी शब्द दिला आहे. हिंद महासागर क्षेत्रात श्रीलंकेची भौगोलिक स्थिती लक्षात घेता भारतासाठी हे विधान खूप महत्वाचं आहे.
श्रीलंका हा देश हिंद महासागरातील महत्वपूर्ण समुद्री मार्गावर आहे. कोलंबो, हंबनटोटा आणि श्रीलंकेच्या आसपासचा समुद्री भाग भारताच्या समुद्री सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. चीनच्या हिंद महासागर क्षेत्रातील वाढत्या हालचाली लक्षात घेता भारत श्रीलंकेमध्ये मजबूत रणनितीक संबंध आवश्यक आहेत. श्रीलंकेसोबत विश्वासार्ह संरक्षण भागीदारी ठेवण्यावर भारताचा फोकस आहे. हिंद महासागरात बाहेरील शक्तीच्या हालचालींमुळे थेट भारताच्या सुरक्षेला धोका उत्पन्न होऊ शकतो.
एअर डिफेन्स क्षमता मजबूत होईल
भारत श्रीलंकेचे संबंध आता फक्त सैन्य उपकरणं देण्यापर्यंत मर्यादीत नाहीत. श्रीलंकेच्या 6 L70 एअर डिफेन्स गनचं अपग्रेडेशन, दोन्ही देशांच्या नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये सहकार्य आणि NCC यूथ एक्सचेंज प्रोग्राम हे दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य वाढत असल्याचे संकेत आहेत. L70 गन्सच्या अपग्रेडेशनमुळे श्रीलंकेची महत्वपूर्ण ठिकाणांवर एअर डिफेन्स क्षमता मजबूत होईल. त्याशिवाय डिफेन्स कॉलेज आणि NCC मधील सहकार्यामुळे दोन्ही देशातील सैन्य संस्था आणि युवा कॅडेट्समध्ये आपसात सहकार्य वाढेल.
श्रीलंका ‘नेबरहुड फर्स्ट’ रणनितीचा भाग
‘दितवाह’ चक्रीवादळाच्यावेळी भारताकडून करण्यात आलेलं मदत आणि पूनर्वसन सहकार्य याच रणनितीचा भाग आहे. श्रीलंकेची मदत करुन भारत काही उपकार करत नाहीय, तर ती भारताची जबाबदारी आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. भारताची रणनिती केवळ सैन्य सहकार्यापर्यंत मर्यादीत नाहीय. संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मानवी सहाय्यता, ट्रेनिंग आणि समुद्री सुरक्षा या सर्व आघाडींवर श्रीलंकेसोबत भागीदारी भक्कम करण्याचा भाग आहे. श्रीलंका हा देश भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ हिंद महासागर क्षेत्रातील रणनितीचा भाग आहे.