
भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात दीर्घकाळ चाललेल्या मुक्त व्यापार करार (FTA) वाटाघाटी अखेर पूर्ण झाल्या आहेत. सर्व जगाचं लक्ष याकडे लागलेलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे जगभरातील अनेक देशांसोबतच्या व्यापार संबंधांमध्ये तणाव वाढलेला असतानाच, अशा वेळी हे पाऊल उचलण्यात आले आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेने भारतावर जोरदार आरोप केले आहेत.
भारत-EU FTA : वाटाघाटी पूर्ण
भारत आणि युरोपियन युनियनमधील FTA वाटाघाटी 2007 साली सुरू झाल्या. आता, हा करार “कायदेशीर छाननीसाठी” तयार आहे असं दोन्ही बाजूंकडून सांगण्यात आलं आहे. 27 जानेवारी म्हणजे आजच याची औपचारिक घोषणा होऊ शकते. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी याला “मदर ऑफ ऑल डील्स” असं म्हटलं आहे.
रशियाच्या तेलावर अमेरिकेचे आरोप
मात्र भारताच्या या डील्स अमेरिकेला फारशआ रुचलेल्या दिसत नसून त्यांचा जळफळाट झाला आहे. त्यातच भारत रशियाकडून जे तेलं घेतं त्यामुळेही अमेरिकेचा पारा चढलेला असतो, हे जगजाहीर आहेच. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे सहकारी, अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी केलेलं एक विधानही चर्चेत आलं आहे. भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो, ते शुद्ध करतो आणि नंतर युरोपीय देश तीच तेल उत्पादनं खरेदी करतात. यामुळे रशिया-युक्रेन युद्धाला निधी मिळत असल्याचे बेसेंट यांनी म्हटलं होतं. याच (रशियाकडून तेल खरेदी) कारणामुळे अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लावला, जो नंतर वाढवून 50% करण्यात आला, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
ट्रम्प प्रशासनाची कडक भूमिका
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेने नुकताच असा दावा केला की, रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी त्यांनी युरोपपेक्षा जास्त “बलिदान” दिले आहे. युरोप स्वतःविरुद्धच्या युद्धाला निधी पुरकवत आहे, असंही अमेरिकेचं म्हणणं आहे.
भारतावर 50% पर्यंत टॅरिफ
अमेरिकेने भारतावर एकूण 50% कर लादला आहे, त्यापैकी 25% कर हा रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे आहे. ऑगस्ट 2025 मध्येहा निर्णय घेण्यात आला होता. एकीकडे भारतविरद्ध सख्त भूमिका घेतानाच दुसरीकडे ट्रम्प हे सतत भारत आपला मित्रच असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. टॅरिफच्या तणावादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारत आणि अमेरिका हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात जुने लोकशाही देश आहेत आणि त्यांचे संबंध ऐतिहासिक आहेत असेही ते नुकतेच म्हणाले.
ट्रम्पच्या धोरणांशी रिपब्लिकन नेते असहमत
ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेचे नुकसान होऊ शकते असे रिपब्लिकन सिनेटर टेड क्रूझ यांनी म्हटले. यामुळे निवडणुकीतील नुकसान आणि राजकीय संकट निर्माण होऊ शकते असा इशारात्यांनी ट्रम्प यांना दिल्याचं एका मीडिया रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं.
अमेरिकेच्या कठोर व्यापार धोरणांमुळे कॅनडा देखील भारतासोबतचे संबंध पुन्हा दृढ करत आहे. पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखाली, कॅनडा भारताकडे एक प्रमुख धोरणात्मक आणि व्यापारी भागीदार म्हणून पाहतो. अमेरिकेने कॅनडावरही मोठे कर लादण्याची धमकी दिली आहे. युरोपियन युनियन आणि कॅनडासोबतच्या संबंधांच्या बळकटीकरणाचा फायदा भारताला होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे भारताला ऊर्जा सुरक्षा, नवीन बाजारपेठा आणि अमेरिकेच्या शुल्काच्या दबावापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.