
India US Joint Statement: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसोबत चार तास बैठक झाली. या बैठकीनंतर गुरुवारी वॉशिंग्टन डीसी येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संयुक्त निवेदन जारी केले. दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनामध्ये पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा असल्याचा मुद्दाही होता. यासोबतच दहशतवादाबाबत पाकिस्तानवर कारवाई करण्यात यावी, असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे. आता दोन्ही देशांच्या या संयुक्त निवेदनानंतर पाकिस्तानचा जळफळाट सुरु झाला आहे. या वक्तव्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी भारत-अमेरिकेच्या निवेदनावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, अमेरिका आणि भारताचे हे विधान केवळ एकतर्फी नाही तर दिशाभूल करणारे आहे. राजनैतिक नियमांच्या विरोधात आहे. पाकिस्तानने केलेल्या बलिदानाकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे पाकिस्तानला धक्का बसला आहे. परंतु भारताचा दहशतवादाला असलेला पाठिंबा अशा गोष्टींमधून लपवता येणार नाही, असेही शफकत अली खान यांनी म्हटले.
26/11 आणि पठाणकोट हल्ल्यातील दोषींना पाकिस्तानने शिक्षा करावी, असे भारत आणि अमेरिकेने संयुक्त निवेदनात म्हटले आहे. यासोबतच पाकिस्तानने त्यांच्या भूमीचा वापर अन्य कोणत्याही देशात दहशतवादी कारवायांसाठी होणार नाही याची काळजी घ्यावी. दहशतवादासोबत जागतिक संकट म्हणून लढले पाहिजे. जगात कुठेही असणारे दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले पाहिजे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे नाव न घेता मोठा इशारा दिला. ट्रम्प म्हणाले, या वर्षाच्या सुरुवातीपासून अमेरिकेने भारतासोबत अब्जावधी डॉलर्सची लष्करी खरेदी वाढवली आहे. जगासाठी धोकादायक बनलेल्या कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि भारत पूर्वीप्रमाणेच एकत्र काम करत राहतील. ट्रम्प यांना चीनसोबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी चीन हा महत्वपूर्ण देश आहे. चीनसोबत आमचे संबंध सुधारतील, अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली.