अमेरिकेसोबत व्यापार कराराबाबत सकारात्मक पाऊल, भारताकडून पहिलं विधान आलं समोर

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार गेल्या काही दिवसांपासून थंड बस्त्यात गेला होता. अमेरिकेने लादलेल्या टॅरिफनंतर भारताच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे असं असताना दोन्ही देशात पुन्हा एकदा व्यापार करारावर चर्चा तीव्र झाली आहे. यातून सकारात्मक गोष्टी समोर येत आहेत.

अमेरिकेसोबत व्यापार कराराबाबत सकारात्मक पाऊल, भारताकडून पहिलं विधान आलं समोर
अमेरिकेसोबत व्यापार कराराबाबत सकारात्मक पाऊल, भारताकडून पहिलं विधान आलं समोर
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 16, 2025 | 9:04 PM

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादल्यानंतर निर्यातीची सर्वच घडी फिस्कटली आहे. त्यामुळे दोन्ही देशांचा नुकसान होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर मंगळवारी नवी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अमेरिकेचे मुख्य वाटघाटीकार ब्रँडन लिंच आणि त्यांच्या टीमने वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताकडून उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल आणि त्यांची टीम उपस्थित होती. खरं तर ही अधिकृतपणे सहाव्या फेरीची चर्चा नव्हती. तर त्या चर्चेपूर्वीच रंगीत तालीम होती असं म्हणायला हरकत नाही. या बैठकीमुळे सहाव्या फेरीचं चित्राला आकार मिळाला आहे. कारण या बैठकीत सध्याचा व्यापार भागीदारी आणि द्विपक्षीय व्यापार कराराशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. सध्या व्यापारी वर्ग या बैठकीकडे लक्ष लावून बसला आहे. कारण या बैठकीत काही सकारात्मक मार्ग निघाला तर पुढची वाटचाल सोपी होणार आहे. या बैठकीत सहाव्या फेरीच्या चर्चेला कधी सुरुवात होईल आणि कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल हे देखील ठरविण्यात आले.

या बैठकीत व्यापार संबंधांचे महत्त्व समजून घेण्यात आलं. दोन्ही बाजूंनी ही चर्चा सकारात्मक आणि भविष्याच्या दृष्टीने योग्य मार्गावर असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघाला तर दोन्ही देशातील व्यापार कराराला अंतिम रुप दिले जाऊ शकते. कारण ट्रम्प सरकारच्या टॅरिफ नीतिमुळे ही चर्चा थांबली होती. खासकरून अमेरिकेने भारताच्या कृषी आणि दुग्ध बाजारपेठेत प्रवेश मागितला होता. या मागणीला भारताने विरोध केला होता. त्यामुळे ही चर्चा फिस्कटली होती. आता पुन्हा एकदा चर्चेच्या जोर बैठका सुरु झाल्या आहेत.

दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यामुळे सकारात्मक वातावरण तयार झालं आहे. ट्रम्प म्हणाले की, दोन्ही देशांमधील व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी चर्चा सुरु आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा उल्लेख चांगला मित्र असा केला. भारत आणि अमेरिका चांगले मित्र आणि भागीदार आहेत, असंही मोदी पुढे म्हणाले. त्यामुळे दोन्ही देशात सकारात्मक चर्चा होत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

भारतीय अधिकाऱ्यांनी बैठकीपूर्वीच्या चर्चेत काय झालं ते सांगितलं. ही बैठक सहाव्या फेरीची औपचारिक चर्चा नव्हती, तर त्यापूर्वीच्या तयारी आणि रणनीतीवर चर्चा होती. भारत आणि अमेरिका यांच्यातील बीटीएच्या चर्चेला पुन्हा गती मिळत आहे. दोन्ही देशांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे आणि नोव्हेंबरपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहेत.