अमेरिकेत भारतीयाचं धड वेगळं करून संपवलं! ट्रम्प म्हणाले, बेकायदेशीर राहणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
अमेरिकेत गेल्या काही दिवसांता हिंसाचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. प्रशासनाचा वचक राहिला नाही असंच दिसत आहे. अशीच एक दुर्दैवी घटना 10 सप्टेंबर रोजी अमेरिकेतली डलास येथे घडली. या घटनेत भारतीय नागरिक असलेल्या चंद्रा नागमल्लैयाचा यांची हत्या करण्यात आली.

अमेरिकेत 10 सप्टेंबरचा दिवस डलासमध्ये राहणाऱ्या भारतीय कुटुंबियासाठी दु:खद ठरला. अमेरिकेतली भारतीय नागरिक नागमल्लैया यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली. इतकंच काय तर पत्नी आणि मुलासमोर क्रूरपणे त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. हे घृणास्पद कृत्य एका बेकायदेशीर क्युबन रहिवाशाने केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डलासमध्ये मोटल व्यवस्थापक चंद्रा मौली नागमल्लैया आणि कर्मचारी योर्डानिस यांच्यात वॉशिंग मशीन बिघाडावरून वाद सुरु झाला. व्यवस्थापक नागमल्लैया यांनी कर्मचारी योर्डानिसला तुटकी वॉशिंग मशिन वापरण्यास मनाई केली. व्यवस्थापकाने थेट सांगण्याऐवजी दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून योर्डानिसला ही सूचना दिली. त्याचा राग योर्डानिसच्या मनात घर करून राहिला.
व्यवस्थापक नागमल्लैया यांच्यावर त्याने थेट कुऱ्हाडीने हल्ला चढवला. नागमल्लैया यांनी पार्किंगमधून ऑफिसमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला. इतकंच काय पत्नी आणि मुलानेही योर्डानिसला अडवलं. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. त्याने कुऱ्हाडीचे घाव घातले आणि त्यांचं धड वेगळं करून संपवलं. या प्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं की, चंद्र नागमल्लैया यांच्या क्रूर हत्या केल्याची घटना माझ्या कानावर पडली आहे. मी तुम्हाला खात्री देतो की, बेकायदेशीर गुन्हेगार स्थलांतरितांबद्दल उदारतेचा काळ संपला आहे. माझे सरकार देशाला पुन्हा सुरक्षित करण्यासाठी उत्तम काम करत आहे. गुन्हेगार आता आमच्या ताब्यात आहे आणि त्याच्याविरुद्ध खूनाचा खटला चालवला जाईल. त्याला कायद्यानुसार सर्वात कठोर शिक्षा मिळेल.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, योर्डानिसला यापूर्वी बाल शोषण, कार चोरी आणि जबरदस्तीने ओलीस ठेवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पण जो बायडेन यांच्या अपयशामुळे त्याला पुन्हा सोडण्यात आलं. जर योर्डानिस दोषी आढळला तर त्याला पॅरोलशिवाय जन्मठेपेची किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते.
