इराण-इस्रायल युद्ध पेटलेले असताना महाराष्ट्रात बॉम्बची धमकी, नेमकं काय घडलं?
नांदेड बसस्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या शेख सलीमला पोलिसांनी अंबाजोगाईतून अटक केली आहे. मारणे गँगचा शार्प शूटर असल्याचा बनाव करून त्याने हा खोटी धमकीचा फोन केला होता.

सध्या इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सातत्याने संघर्ष सुरु आहे. या संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण झालेली असताना दुसरीकडे राज्यातील एका बस स्थानकाला उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मी मारणे गँगचा शार्प शूटर आहे आणि नांदेड बसस्थानक बॉम्बने उडवून देणार आहे, अशा आशयाचा धमकीचा फोन आल्याने पोलीस प्रशासनाची झोप उडाली आहे. याप्रकरणी नांदेड पोलिसांनी अखेर आरोपीला जेरबंद केले आहे. शेख सलीम शेख चांदपाशा (३५) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. सायबर सेलच्या मदतीने नांदेडच्या वजीराबाद पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
नेमकी घटना काय?
५ मार्च रोजी दुपारी नांदेड पोलीस नियंत्रण कक्षाला (Control Room) एक निनावी फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने अत्यंत आक्रमक भाषेत संवाद साधला. त्या व्यक्तीने आपण पुण्यातील कुप्रसिद्ध मारणे गँगशी संबंधित असल्याचे सांगितले. तसेच त्या नांदेड बसस्थानकावर बॉम्बस्फोट होणार आहे, अशी धक्कादायक माहिती दिली. हा फोन येताच पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बसस्थानकावरील बंदोबस्तात वाढ केली.
त्याचवेळी बसस्थानकावरील तक्रार पेटीची (Complaint Box) तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. धक्कादायक म्हणजे, या पेटीत एक हस्तलिखित चिठ्ठी आढळून आली, ज्यामध्ये बॉम्बस्फोटाचा आणि दहशतीचा उल्लेख करण्यात आला होता. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
सध्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला. ज्या नंबरवरून फोन आला होता, त्याचे लोकेशन बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे दाखवत होते. पोलिसांनी तात्काळ एक पथक अंबाजोगाईकडे रवाना केले. तपासात असे समोर आले की, आरोपी शेख सलीम याने स्वतःचा मोबाईल न वापरता एका स्थानिक पाणीपुरी विक्रेत्याचा मोबाईल वापरला होता. मला एक अत्यंत महत्त्वाचा फोन करायचा आहे, माझे बॅलन्स संपला आहे, असे खोटे कारण सांगून त्याने विक्रेत्याचा फोन घेतला. त्यावरून त्याने नांदेड पोलिसांना धमकी दिली.
आरोपीला अटक आणि गुन्ह्याची कबुली
पाणीपुरी विक्रेत्याने दिलेल्या वर्णनावरून आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने नांदेड पोलिसांनी अंबाजोगाईच्या मनियार गल्लीत सापळा रचला. पोलिसांनी शेख सलीमला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने चिठ्ठी टाकल्याची आणि खोटा फोन केल्याची कबुली दिली. आरोपीने हे कृत्य नेमक्या कोणत्या उद्देशाने केले, त्याचा मारणे गँगशी काही संबंध आहे का, की केवळ खोडसाळपणा म्हणून त्याने हे केले, याचा सखोल तपास वजीराबाद पोलीस करत आहेत. सध्या आरोपी शेख सलीम हा पोलीस कोठडीत आहे. त्याच्यावर सार्वजनिक शांतता भंग करणे आणि दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
