
अनेक वर्षांपासून भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले राहिले आहेत. मात्र, टॅरिफच्या प्रश्नावरून हे संबंध ताणले गेले असल्याचे बघायला मिळतंय. टॅरिफवरून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला धमक्या दिल्या जात आहेत. भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. अमेरिकेकडून भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ हा लावण्यात आला आहे. टॅरिफचा मुद्दा पेटलेला असतानाच आता एक अत्यंत मोठी अशी बातमी पुढे येताना दिसत आहे. अमेरिकी ट्रेड टीम ही भारताच्या दाैऱ्यावर येणारी होती, त्यांचा नियोजित दाैरा होता. मात्र, त्यांनी आता अचानक त्यांचा हा दाैरा रद्द केलाय.
प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावरील चर्चेचा सहावा टप्पा अमेरिकेने पुढे ढकलल्याने भारताला मोठा धक्का बसला. अमेरिकेची ट्रेड टीम भारतात येऊन काही मुद्दावर चर्चा करणार होती आणि काही महत्वाचे करार देखील होणार होते. मात्र, आता तो दाैरा पुढे ढकलण्यात आलाय. ही बैठक दिल्लीमध्ये 25 ते 29 ऑगस्टपर्यंत चालणार होती. एका अमेरिकी अधिकाऱ्याने या बैठकीबद्दल बोलताना म्हटले की, आम्ही आमचा भारताचा नियोजित दाैरा पुढे ढकलत आहोत. मात्र, आता ही बैठक पुढे कधी होणार हे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले नाहीये.
आतापर्यंत भारत आणि अमेरिकेत व्यापाराबाबत पाच बैठका झाल्या आहेत. ही सहावी महत्वाची बैठक होती. मात्र, सध्याच्या टॅरिफच्या वादावरून ही बैठक रद्द करण्यात आलीये. ही बैठक रद्द झाल्याने हा भारताला अत्यंत मोठा झटका म्हणावा लागेल. ही बैठक भारतासाठी अत्यंत महत्वाची होती, कारण 27 ऑगस्टपासू भारतावर 50 टक्के टॅरिफ लागणार आहे. ही बैठक झाली असतील तर काही महत्वाच्या गोष्टींवर निर्णय घेतले जाऊ शकले असते. मात्र, आता ही बैठक अमेरिकेकडून रद्द करण्यात आलीये. अमेरिकेकडून अजून पुढची तारीख जाहीर करण्यात आली नाहीये.
अमेरिकेला भारतातील कृषी आणि दुग्धजन्य क्षेत्रात अधिक व्यापार करायचा आहे. मात्र, अमेरिकेला भारताकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले की, भारत हा त्यांच्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर निर्णय घेईल. मुळात म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि जर अमेरिकी कंपन्या या भारतीय बाजारपेठेत कृषी संबंधित गोष्टींमध्ये व्यापार करत असतील तर हा भारतीय शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचे भारतालाचे म्हणणे आहे.