India-Pakistan : कूटनितीक विश्वातील दोन घटनांनी पाकिस्तानला दिला झटका, भारताने सगळा गेमच फिरवला

India-Pakistan : जागतिक राजकारणात कूटनितीक आघाडीवर अशा दोन घटना घडल्या आहेत, जो पाकिस्तानसाठी मोठा झटका आहे. पाकिस्तानच्या इतक्या महिन्याच्या मेहनतीवर भारताने एका झटक्यात पाणी फिरवलं. भारताचे दोन रणनितीकार सध्या महत्वाच्या मिशनवर आहेत.

India-Pakistan : कूटनितीक विश्वातील दोन घटनांनी पाकिस्तानला दिला झटका, भारताने सगळा गेमच फिरवला
Modi-Sharif
| Updated on: Feb 05, 2026 | 12:38 PM

पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासोबत मिळून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्याचे सर्व प्रयत्न केले. शरीफ-मुनीर यांच्या हायब्रिड सरकारने त्यांना नोबेल पुरस्कारासाठी नॉमिनेट केलं. आपलं खनिज संपत्तीच भंडार अमेरिकेसाठी उघडं केलं. या दरम्यान व्हाइट हाऊसमधला शहबाज-मुनीर जोडीचा एक फोटो व्हायरल झालाय. त्यात पाकिस्तानी सैन्य प्रमुख, ट्रम्प यांना खनिजं आणि किंमती दगडांनी भरलेली एक ब्रीफकेस उघडून दाखवत आहेत. दुसरीकडे भारत ट्रम्प यांच्या दादागिरीसमोर ठामपणे उभा राहिला. त्यांच्या कुठल्याही अटींसमोर तडजोड करायला नकार दिला. भारताने ट्रम्प यांच्या अटींवर ट्रेड डील केली नाही तसच त्यांना खुश करण्यासाठी नोबेल नॉमिनेशही केलं नाही. भारत ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफसमोर अजिबात झुकला नाही. त्यांच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करुन रशियाकडून कच्चा तेलाची खरेदी सुरुच ठेवली.

ट्रम्प स्वत:च ट्रेड डीलसाठी भारताकडे आले. आता दोन्ही देशांमध्ये व्यापार करार होणार आहे. व्यापार करारावरुन पाकिस्तानात शहबाज-मुनीर यांची मोठी फजिती झाली. फक्त ते ट्रम्प यांना खुश करण्यात मग्न राहिले. पण दुसऱ्याबाजूला भारत बाजी मारुन गेला. ट्रम्प प्रशासनाने भारतावरील टॅरिफ 50 टक्क्याने घटवून 18 टक्के केला. पाकिस्तानवरील टॅरिफ 19 टक्के आहे.

अमेरिकेकडून भारताला लगेच निमंत्रण

भारतासोबत ट्रेड डील झाल्यानंतर लगेचच अमेरिकेने भारताला क्रिटिकल मिनरल्सवर आयोजित पहिल्या मंत्री स्तरीय बैठकीत सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठवलं. या बैठकीसाठी परराष्ट्र मंत्री 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान अमेरिकेत होते. अमेरिकी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी सहभाग घेतला.

जयशंकर-रुबियो भेट

बुधवारच्या बैठकीआधी जयशंकर यांनी रुबियो यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. यात दोन्ही बाजूंनी क्वाडच्या माध्यमातून द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य पुढे नेण्यासाठी कटिबद्धता दाखवली. दोन्ही नेत्यांनी अणवस्त्र सहकार्य, संरक्षण संबंध, महत्वाची खनिजं, व्यापार आणि ऊर्जेसह अनेक मुद्यांवर चर्चा केली.

याआधी जयशंकर यांनी अमेरिकी अर्थ मंत्री स्कॉट बेसेंट यांची भेट घेतली. दोन्ही बाजूंनी भारत-अमेरिका आर्थिक भागिदारी पुढे नेणं आणि रणनितीक सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा केली.

सौदीकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न

मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पाच दिवसीय सौदी अरेबिया दौऱ्यावर पोहोचले आहेत. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये म्यूचूअल डिफेंस एग्रीमेंट झालं. त्यानंतर सौदीला भेट देणारे डोवाल भारत सरकारचे पहिले वरिष्ठ अधिकारी आहेत. परिचित सूत्रांच्या माहितीनुसार, या दौऱ्यात सौदी अरेबिया डोवाल यांना पाकिस्तानसोबत झालेल्या डिफेन्स पॅक्टची माहिती देणार आहे.

Follow Us