
मूळची केरळची असलेल्या पण गेल्या काही वर्षांपासून येमेनमध्ये कार्यरत असलेली भारतीय नर्स निमिषा प्रिया हिची मृत्यूदंडाची शिक्षा टळल्याने तिचे कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. निमिषाला या महिन्याच्या 16 तारखेला सनाच्या तुरुंगात फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार होती, परंतु भारत सरकार, धार्मिक नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे ही शिक्षा स्थगित करण्यात आली. आता अखेर निमिषाला जीवदान मिळालं आहे. येमेनमध्ये तिची फाशीची शिक्षा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. या संदर्भात, भारतीय ग्रँड मुफ्ती कंठापुरम एपी अबुबकर मुसलियार यांच्या कार्यालयाने निमिषाची शिक्षा रद्द करण्यात आल्याची पुष्टी केली आहे. अशा प्रकारे, निमिषाचा आता, तिच्या कुटुंब आणि मुलांकडे भारतात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोण आहे निमिषा प्रिया ?
निमिषा प्रिया ही केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील कोलेनगोडे येथील 38 वर्षांची नर्स आहे. 2008 साली चांगल्या नोकरीसाठी ती येमेनला गेली आणि सना येथील एका सरकारी रुग्णालयात नर्स म्हणून काम करू लागली. 2011 साली तिने टॉमी थॉमसशी लग्न केले आणि दोघेही येमेनमध्ये राहू लागले. 2014 मध्ये येमेनमधील यादवी युद्धामुळे तिचा नवरा आणि मुलगी भारतात परतले, पण निमिषा तिथेच राहिली. तर 2015 साली निमिषाने येमेनी नागरिक तलाल अब्दो महदी याच्यासह भागीदारीत अल अमान मेडिकल क्लिनिक सुरू केले, कारण येमेनी कायद्यानुसार परदेशी लोकांना स्थानिक भागीदार असणे आवश्यक आहे.
काय होता गुन्हा ?
निमिषाच्या सांगण्यानुसार, तलालने तिची फसवणूक केली. त्याने तिचे उत्पन्न बळकावले. तसेच त्याने तिचा पासपोर्ट जप्त केला आणि तिला मानसिक व शारीरिक त्रासही दिला. बनावट कागदपत्रे तयार करून त्याने स्वतःला निमिषाचा पती असल्याचेही सांगितले. 2017 साली तिची कागदपत्रे परत मिळवण्यासाठी, निमिषाने तलालला केटामाइन (बेशुद्ध करण्यासाठी एक इंजेक्शन) दिले. परंतु औषधाच्या अतिसेवनामुळे तलालचा मृत्यू झाला. घाबरून निमिषाने मृतदेहाचे तुकडे केले आणि पाण्याच्या टाकीत फेकून दिले आणि येमेन-सौदी सीमेवर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना तिला पकडण्यात आले. 2018 मध्ये येमेनी न्यायालयात खटला सुरू झाला आणि 2020 साली तिलाशरिया कायद्याअंतर्गत ‘किसास’ (बदला) च्या आधारावर मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. 2023 मध्ये, येमेनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेने ही शिक्षा कायम ठेवली आणि डिसेंबर 2024 मध्ये राष्ट्रपती रशाद अल-अलीमी यांनीही ही शिक्षा मंजूर केली.
मृत्यूदंडाची शिक्षा का मिळाली ?
खरंतर, येमेनमध्ये शरिया कायदा लागू आहे. किसास अंतर्गत, हत्येसाठी मृत्यूदंड दिला जातो. निमिषावर तलालची हत्या केल्याचा आरोप सिद्ध झाला आणि न्यायालयाने तो जाणूनबुजून केलेला गुन्हा मानला. निमिषाच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की, तिला योग्य कायदेशीर मदत आणि अनुवादक मिळाला नाही, ज्यामुळे ती तिची बाजू ठामपणे मांडू शकली नाही. तलालच्या कुटुंबाने, विशेषतः त्याचा भाऊ अब्देलफत्ताह मेहदीने ‘किसास’ची मागणी केली आणि ब्लडमनी स्वीकारण्यास नकार दिला.
ब्लड मनी म्हणजे काय ?
ब्लड मनी ला अरबी भाषेत दिया (Diyya) म्हटलं जातं. ही इस्लामिक शरिया कायद्याची तरतूद आहे. खून किंवा गंभीर शारीरिक हानी झाल्यास पीडितेच्या कुटुंबाला भरपाई म्हणून देण्यात येणाऱ्या रकमेला ब्लडमनी असं म्हणतात. ही व्यवस्था प्रामुख्याने येमेन, सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांसारख्या इस्लामिक देशांमध्ये लागू आहे. शरिया कायद्यानुसार, हत्येसारख्या गुन्ह्यांना ‘किसास’ (बदला) अंतर्गत मृत्युदंड दिला जाऊ शकतो, परंतु पीडितेचे कुटुंब गुन्हेगाराला माफ करू शकते, जर त्यांनी ‘दीया’ स्वीकारलं तर…
मृत्यूदंडाची शिक्षा कशी टळली ?
निमिषाची फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात भारत सरकार, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि ग्रँड मुफ्ती शेख अबुबकर अहमद यांची भूमिका महत्त्वाची होती. शेख अबुबकर यांनी येमेनी सूफी विद्वान शेख उमर बिन हाफिज यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर तलालच्या कुटुंबाने शिक्षा तात्पुरती पुढे ढकलण्यास सहमती दर्शविली. दरम्यान, सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन कौन्सिलने ब्लड मनीसाठी 58 हजार अमेरिकन डॉलर्स जमा केले आणि केरळचे व्यापारी एम.ए. युसुफ अली यांनीही आर्थिक मदत देऊ केली. येमेनमध्ये हुथी बंडखोरांचे नियंत्रण असूनही आणि औपचारिक राजनैतिक संबंधांचा अभाव असूनही, भारत सरकारने इराणसारख्या देशांद्वारे वाटाघाटी केल्या आहेत. या प्रकरणात 14 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत भारत सरकारने या प्रयत्नांची माहिती दिली होती. त्यानंतर, फाशी 14 ऑगस्ट 2025 सालापर्यंत पुढे ढकलण्यात आली.
आता पुढे काय ?
निमिषाचा जीव वाचवण्याचा ब्लडमनी हा अजूनही एकमेव मार्ग आहे, परंतु तलालचे कुटुंब (मागणीवर) ठाम आहे. येमेनी राष्ट्राध्यक्षांना विशेष परिस्थितीत माफी देण्याचा अधिकार आहे, परंतु हे कठीण आहे. भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्रे किंवा रेड क्रॉस सारख्या मानवाधिकार संघटनांची मदत घेऊ शकता. निमिषाची आई प्रेमा कुमारी एप्रिल 2024 पासून येमेनमध्ये आहेत आणि तलाल कुटुंबाकडून त्या माफीची याचना करत आहेत. साना तुरुंगात निमिषाची परिस्थिती दयनीय आहे, जिथे हुथींच्या नियंत्रणाखाली मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी सामान्य आहेत.