
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरगुंडी सुरुच असल्याचं दिसत आहे. अमेरिकेच्या टॅरिफमुळे या आणखी भर पडली आहे. त्यामुळे रुपयाची ताकद वाढवण्याचं मोठं आव्हान आहे. पण त्यात काही यश मिळताना दिसत नाही. चालु वर्षात रुपया 3 टक्क्यांहून अधिक घसरल्याचं पाहायला मिळालं आहे. तर या वर्षाच्या सुरुवातीला रुपया ज्या ठिकाणी होता, तेथून 5 टक्क्याहून अधिक घसरला आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतीय रुपयावर टॅरिफचा प्रभाव सर्वाधिक पाहायला मिळत आहे. त्यामुळे रुपयाची ताकद कमी होत असल्याचं दिसत आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 8 पैसे खाली पडली असून 88.18 पर्यंत सर्वात खालच्या पातळीवर बंद झाला आहे. परकीय व्यापार चलन तज्ज्ञांच्या मते, परकीय भांडवलाचा सतत प्रवाह किंवा डॉलर मजबूत झाल्यामुळे त्यात आणखी घसरण होऊ शकते. मागच्या चार महिन्यात रुपयाची 5 टक्क्याहून अधिक घसरण झाली आहे. विशेष म्हणजे आशियाई देशात भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत सर्वात वाईट कामगिरी करणारं चलन ठरलं आहे.
मिरे अॅसेट शेअरखानचे चलन आणि वस्तूंचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी यांच्या मते, व्यापार शुल्कावरील अनिश्चितता आणि कमकुवत देशांतर्गत बाजारपेठांमुळे रुपयावर दबाव येऊ शकतो, त्यामुळे रुपया किंचित नकारात्मक ट्रेंडसह व्यापार करेल अशी शक्यता आहे. मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणापूर्वी बाजार अस्थिर असण्याची शक्यता आहे. डॉलर/रुपयाची स्पॉट किंमत 87.80 ते 88.50 दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, बाजारात मंदीचं लक्षणं आहेत. त्यामुळे डॉलर निर्देशांकात वाढ झाली आणि डॉलर 0.63 टक्क्यांनी वाढून 98.38 वर पोहोचला. तर शेअर बाजारातही त्याचे परिणाम दिसून येत आहेत.
देशाचे चलन कमकुवत झाले की त्याचे अनेक दुष्परिणाम पाहायला मिळतात. कमकुवत रुपयाचा तुमच्यावर काय परिणाम होईल ते जाणून घेऊयात. तुमचा मुलगा दुसऱ्या देशात शिकत असेल आणि तुम्हाला भारतातून पैसा पाठवायचा असेल तर तुमचं नुकसान होईल. तुमचा मुलगा अमेरिकेत शिक्षण घेत असेल आणि तुम्ही त्याला येथून पैसे पाठवले. तर डॉलरच्या तुलनेत त्याचं अवमूल्यन होईल. त्यामुळे तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे पाठवावे लागतील. पण दुसरीकडे, अमेरिकेत तुमचा एखादा नातेवाईक काम करत असेल आणि त्याने तुम्हाला पैसे पाठवले तर तुमचा फायदा होईल. कारण तुम्हाला जास्तीचे पैसे मिळतील.