25 वर्षात अमेरिकेने जे कमावलं ते 25 तासात…, USISPF अध्यक्ष अघी यांचं ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे भारतासोबतचे संबंध ताणले गेले आहेत. भारताने देखील अमेरिकेच्या कठोर भूमिकेनंतर पाठ फिरवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे गेल्या 25 वर्षातील भारत अमेरिका संबंध 25 तासात ताणले गेले, असा आरोप अमेरिकेचे आयएसपीएफ अध्यक्ष मुकेश अघी यांनी केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादून वेठीस धरलं आहे. भारताला अमेरिकेत निर्यात करणं कठीण झालं आहे. त्यामुळे भारताने नवा पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भारताची भूमिका पाहता आता अमेरिकेतही पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी मंचाचे अध्यक्ष आणि सीईओ मुकेश अघी यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफवर टीकास्त्र सोडलं आहे. हा टॅरिफ अनावश्यक असल्याची टीका त्यांनी एएनआयशी बोलताना केलं आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. अनेक वर्षांपासून असलेले मैत्रिपूर्ण संबंध धोक्यात येण्याची शक्यता आहे. ‘निराशाजनक गोष्ट म्हणजे गेल्या 25 वर्षात असलेले चांगले संबंध 25 तासातच संपुष्टात येत आहेत. भारत आणि अमेरिका दोघांनाही एकमेकांची गरज असल्याने आपण वचनबद्ध राहणे महत्त्वाचे आहे. दुसऱ्यांदा लादलेला टॅरिफ हा अनावश्यक होता.’, असं अघी यांनी सांगितलं. दोन्ही देश व्यापार तणावामुळे त्रस्त असले तरी, अमेरिकन व्यवसायिकांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक आहे, हेही अघी यांनी अधोरेखित केले.
“अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्रुथ सोशल पोस्टवर भारताने कोणतीही नकारात्मक प्रतिक्रिया दिलेली नाही. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प का ट्विट करत आहेत? अशा अनेक बातम्या आहेत, एक म्हणजे त्यांना नोबेल पारितोषिक मिळवायचे आहे, तर दुसरी म्हणजे त्यांना मिळणारा सल्ला चुकीचा आहे. निराशाजनक गोष्ट म्हणजे गेल्या 25 वर्षांत निर्माण झालेले संबंध 25 तासांतच संपत आहेत.” असे अघी पुढे म्हणाले. “भारतावर लादलेल्या या अवास्तव दुय्यम शुल्कामुळे दोन्ही बाजूंना त्रास होत आहे. अमेरिकन सीईओंमध्ये एकूणच भावना खूप सकारात्मक आहे; ते त्यांच्या गुंतवणुकीचा वेग कमी करत नाहीत. अमेरिकेतील सीईओंमध्ये भारतावरील विश्वास आणि श्रद्धा कायम आहे. ,” असे अघी यांनी पुढे सांगितले.
सोशल मीडिया हँडल ट्रुथ सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले होते की , ‘भारताने अमेरिकेवर इतके जास्त शुल्क आकारले आहे, जे इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त आहे. आमचे व्यवसायिक भारतात विक्री करू शकत नाहीत. आम्ही भारतासोबत खूप कमी व्यवसाय करतो, पण ते आमच्यासोबत खूप मोठा व्यवसाय करतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ते आम्हाला मोठ्या प्रमाणात वस्तू विकतात, त्यांचा सर्वात मोठा ‘ग्राहक’, पण आम्ही त्यांना खूप कमी विकतो – आतापर्यंत हा पूर्णपणे एकतर्फी संबंध आहे आणि तो अनेक दशकांपासून आहे.”
