युक्रेनमधल्या भारतीयांना शक्य तितक्या लवकर देश सोडण्याच्या सूचना, रशियाकडून मार्शल लॉ लागू

रशियाकडून युक्रेनच्या काही भागावर मार्शल लॉ लावण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने एक परिपत्रक जारी केले आहे.

युक्रेनमधल्या भारतीयांना शक्य तितक्या लवकर देश सोडण्याच्या सूचना, रशियाकडून मार्शल लॉ लागू
रशिया-युक्रेन युद्ध
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 19, 2022 | 11:23 PM

किव्ह, युक्रेनमधील (Ukraine) बिघडलेली सुरक्षा परिस्थिती आणि नुकतेच झालेले हल्ले पाहता भारतीय दूतावासाने (Indian Abbacy) एक एडव्हायजरी (Advisory)  जारी केली आहे. आज भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नागरिकांना युक्रेनमध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दूतावासाने युक्रेनमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना लवकरात लवकर युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला आहे. बुधवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या चार भागात मार्शल लॉ लागू करण्याची घोषणा केली. हे भाग म्हणजे लुहान्स्क, डोनेस्तक, झापोरिझ्झ्या आणि खेरसन, जे बेकायदेशीरपणे रशियाच्या ताब्यात होते. मार्शल लॉच्या घोषणेनंतर, रशियाच्या सर्व प्रदेशांच्या प्रमुखांना अतिरिक्त आपत्कालीन अधिकार मिळाले आहेत.

 

व्लादिमीर पुतिन काय म्हणाले?

व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सांगितले की, मी रशियन फेडरेशनच्या या चार प्रदेशांमध्ये मार्शल लॉ लागू करण्याच्या हुकुमावर स्वाक्षरी केली आहे. त्यानंतर क्रेमलिनने एक हुकूम प्रकाशित केला ज्यानुसार गुरुवारी सकाळपासून संबंधित प्रदेशांमध्ये मार्शल लॉ लागू केला जाईल.

युक्रेनवरील हल्ल्यांमध्ये वाढ

अलीकडे रशियाकडूनही युक्रेनवर हल्ले वाढले आहेत. सोमवारी (17 ऑक्टोबर) युक्रेनच्या अनेक शहरांवर ड्रोन हल्ले करण्यात आले. युक्रेनच्या वतीने ड्रोन हल्ल्यात एका गर्भवती महिलेसह सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याआधी 10 ऑक्टोबर रोजी रशियाकडून युक्रेनमध्ये सुमारे 84 क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाला होता.