
Iran And Israel War: इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर हल्ले केले आहेत. या घटनेनंतर आता इराणनेही आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आम्ही या हल्ल्यांना जशास तसे उत्तर देऊ, अशी धमकीच इराणने दिली आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना आता जगावर तिसऱ्या महायुद्धाचे संकट आले आहे की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण आता या युद्धात रशियादेखील उडी घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेने हल्ला केल्यानंतर आता इराणने रशियाकडे मदतीसाठी याचना केली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची हे रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. आपल्या या दौऱ्यात ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी गंभीर विषयांवर चर्चा करणार आहे. रशिया आणि इराण यांच्यातील संबंध फारच दृढ आहेत, असं अब्बास अरागची यांनी याआधीच सांगितलं आहे. असे असतानाच आता अरागची हे रशियाच्या दौऱ्यावर निघाले आहेत. आता या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे पुतीन यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी अनेक देश इराणला अणूश्सत्र देण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे इराण-इस्रायल युद्धाची स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनीही या युद्धासंदर्भात अनेक मोठी विधानं केली आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता अनेक देश इराणला अण्वस्त्रं देण्यास तयार आहेत, असं म्हटंलय.
सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू असतानाच इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची हे पुतिन यांची भेट घेणार आहेत. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे. रशियाला जाण्याआधी ‘रशिया हा इराणचा मित्र आहे. आम्ही नेहमीच एकमेकांशी चर्चा करतो. मी आज दुपारी मॉस्कोला जात आहे. त्यानंतर उद्या रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्यासोबत माझी बैठक होणार आहे,’ अशी माहिती अब्बास अरागची यांनी दिली आहे.
त्यामुळे आता या बैठकीतून आता नेमकं काय समोर येणार? इराणच्या आवाहनानंतर रशिया या युद्धात उडी घेणार का? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.