दरवाजा-खिडक्या उघडू नका अन्यथा… इराणच्या एका हल्ल्याने इस्रायलमध्ये खळबळ; केमिकल हबच उडवलं!

Iran vs Israel : इराणने इस्त्राईलच्या प्रमुख रासायनिक केंद्रावर बॅलिस्टिक मिसाईलने हल्ला केला आहे. त्यामुळे या ठिकाणी भीषण आग लागली आहे. तसेच केमिकल लिकचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरवाजा-खिडक्या उघडू नका अन्यथा... इराणच्या एका हल्ल्याने इस्रायलमध्ये खळबळ; केमिकल हबच उडवलं!
Iran Big Attack on Israel
Image Credit source: X
| Updated on: Mar 29, 2026 | 9:43 PM

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस आणखी भीषण होताना पहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर भीषण हल्ले होत आहेत. अशातच आता इराणने इस्त्राईलच्या प्रमुख रासायनिक केंद्रावर बॅलिस्टिक मिसाईलने हल्ला केला आहे. त्यामुळे या ठिकाणी भीषण आग लागली आहे. दक्षिण इस्त्राईलमधील निओत होवाव औद्योगिक क्षेत्रात इराणने हा हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर लागलेल्या आगीमुळे रासायनिक गळतीची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या हल्ल्यानंतरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे ढग आकाशात उठताना दिसत आहेत. त्यामुळे यात इस्रायलचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. द टाइम्स ऑफ इस्रायलच्या माहितीनुसार, अग्निशमन आणि बचाव पथके नुकसानग्रस्त भागात युनिट्स सील करण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोहोचली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही, तसेच कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तसेच परिसरातील नागरिकांना घरातच राहण्याचा आणि खिडक्या बंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या हल्ल्यांनंतरचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात काळ्या धुराचे मोठे लोट आकाशात जाताना दिसत आहेत. आयडीएफने (इस्त्राईल डिफेन्स फोर्स) देखील सध्याच्या परिस्थितीचा विचार करून नागरिकांना बाहेर न पडण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव सतत वाढत असताना हा हल्ला झाला आहे. त्यामुळे हे युद्ध आगामी काळात आणखी भीषण रुप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निओत होवाव किती महत्त्वाचे?

निओत होवाव औद्योगिक क्षेत्र हे इस्रायलमधील एक महत्त्वाचे रासायनिक आणि औद्योगिक केंद्र आहे. या ठिकाणी अनेक धोकादायक रसायनांचे उत्पादन आणि साठवण केली जाते. या कारणामुळे या केंद्रावर झालेला हल्ला केवळ लष्करी दृष्टीनेच नव्हे तर पर्यावरण आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही घातक मानला जात आहे. आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.

 

Follow Us