आता आर या पार! इराण खतरनाक मिसाईल बाहेर काढणार, इस्रायल-अमेरिका चिंतेत

अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणने आता बदला घेण्याची घोषणा केली आहे. यासाठी इराण आता आपले सर्वात धोकादायक क्षेपणास्त्र बाहेर काढण्याची शक्यता आहे.

आता आर या पार! इराण खतरनाक मिसाईल बाहेर काढणार, इस्रायल-अमेरिका चिंतेत
iran missile
| Updated on: Jun 22, 2025 | 6:12 PM

इस्रायल आणि इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणवर बॉम्बहल्ला केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ‘अमेरिकेने इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुसंवर्धन केंद्रांवर हल्ला केला आहे आणि ही केंद्रे पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहेत.’

अमेरिकेने इराणवर हा हल्ला करण्यासाठी सर्वात धोकादायक बी-2 बॉम्बर विमान वापरले. हे जगातील एकमेव लढाऊ विमान आहे जे फोर्डोसारख्या इराणच्या भूमिगत अणुसंवर्धन केंद्रावर लक्ष्य करू शकत होते. अमेरिकेने या केंद्रावर 6 बंकर बस्टर बॉम्ब टाकले अशी माहितीही समोर आली आहे.

अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणने आता बदला घेण्याची घोषणा केली आहे. या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेचा निषेध करत म्हटले की, इराणला स्वतःचे रक्षण करण्याचा आणि प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे इराण आता आपले सर्वात धोकादायक क्षेपणास्त्र बाहेर काढण्याची शक्यता आहे.

इराण सर्वात धोकादायक मिसाईल सोडणार

इराणने या युद्धात आतापर्यंत गदर आणि इमाद या जुन्या क्षेपणास्त्रांचा आणि खेबर शकन क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे. खेबर शकन हे क्षेपणास्त्र आपल्या वेगासाठी ओळखले जाते. इराणने केलेल्या या हल्ल्यांमुळे तेल अवीव, जेरुसलेम आणि बीअर शेवा सारख्या इस्रायली शहरांमध्ये मोठा विनाश झालाय मात्र आता अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण त्यांचे सर्वात खतरनाक खोरमशहर क्षेपणास्त्र सोडू शकते, ज्यामुळे इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश होऊ शकतो.

खोरमशहर क्षेपणास्त्र किती धोकादायक?

इराणकडे असलेले खोरमशहर क्षेपणास्त्र 1500 किलो वजनाचे वॉरहेड 2000 किलोमीटर अंतरापर्यंत वाहून नेऊ शकते. इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने या क्षेपणास्त्राच्या लॉन्चिंगचा व्हिडिओ शेअर केला होता. या युद्धात आतापर्यंत इराणने खोरमशहर वापरलेले नाही. मात्र आता आता अमेरिकन हल्ल्यानंतर याचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.