
इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, युद्धामुळे मध्यपूर्वेमधील तणाव प्रचंड वाढला आहे. याचदरम्यन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. ‘Next Week Will Be Very Big..’ पुढच्या आठवड्यात काही तरी खूप मोठं घडणार आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे, किंवा त्यापूर्वी देखील घडू शकतं, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.ट्रम्प यांचा हा इऱाणला इशारा असल्याचं बोललं जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य अशा वेळी आलं आहे, जेव्हा आता इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धानं खतरनाक मोड घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यचा असाही अर्थ लावला जात आहे की, लवकरच या युद्धात आता अमेरिका उडी घेऊ शकते. यापूर्वी देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा इराणला इशारा दिला आहे, मात्र अमेरिकेच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून इराणचं इस्रायलसोबत युद्ध सुरूच आहे.
नेमकं काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
इराणला कोणतीही अट न ठेवता सरेंडर व्हावं लागेल. इराणने माझ्याशी संर्पक साधला होता, त्यांनी व्हाइट हाउसमध्ये येण्याची तयारी दर्शवली होती. मात्र त्यांना स्पष्टच सांगितलं आता खूप उशिर झाला आहे. त्यांची नियत खराब आहे. तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे, गेल्या चाळीस वर्षांपासून ते अमेरिका मुर्दाबाद, इस्रायल मुर्दाबादच्या घोषणा देत आले आहेत. एवढंच नाही ज्या देशांना ते पसंत करत नाहीत, त्याच्याविरोधातही ते घोषणा देतात. इराण हा शाळेतल्या उनाड पोरांसारखा आहे. पुढे पाहूयात काय होतं ते, आता त्यांच्यामध्ये सुधारणा होत आहे, मात्र ही खरच सुधारणा आहे की देखावा? हे येणारा काळच सांगेन, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
दरम्यान इराणवर हल्ल्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले मी खूप काही करू शकतो. मात्र मी सध्या काहीही केलेलं नाही. पण याचा अर्थ असा नाही की मी काही करू शकत नाही. मी काय करणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही, मात्र सत्य हेच आहे की सध्या इराण त्रस्त आहे आणि त्यांनी चर्चेची तयारी दाखवली आहे. दरम्यान डोनाल्ड्र ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर आता इराणवर अमेरिका सैन्य कारवाई करणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.