
मिडिल ईस्ट युद्ध क्षेत्रातून अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायली एअरफोर्सने शनिवारी इराणच्या इस्फहान एअरपोर्टवर जोरदार हवाई हल्ला केला. या स्ट्राइकमध्ये इराणी एअरफोर्सचे F-14 फायटर जेट्स जागीच उद्धवस्त करण्यात आल्याचा दावा इस्रायली एअरफोर्सने केला आहे. इराणी सैन्याचा पायाभूत ढांचा नष्ट करणं हा शनिवारच्या व्यापक हल्ल्यामागचा उद्देश होता, असं IDF कडून सांगण्यात आलं. फक्त इराणी फायटर जेट्सच नाही, तर इस्रायली विमानांना धोका उत्पन्न करणारे रडार आणि एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट करण्यात आली. शुक्रवारी तेहरानच्या मेहराबाद एअरपोर्टवर स्ट्राइक करण्यात आला. त्यानंतर इस्फहान येथे हल्ला झाला. मेहराबादच्या स्ट्राइकमध्ये कुद्स फोर्सची 16 विमानं नष्ट केल्याचा दावा करण्यात आला. संपूर्ण इराणच्या आकाशावर वर्चस्व गाजवण्यासाठी असे हल्ले आणखी वाढवणार आहे, असं इस्रायलने स्पष्ट केलय.
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरु असलेल्या घनघोर युद्धाचा आज 9 वा दिवस आहे. हे युद्ध आता Energy War मध्ये बदललय. अमेरिकी-इस्रायली एअर फोर्सच्या फायटर जेट्सनी आज सकाळी तेहरानमधील प्रमुख तेल डेपोंना लक्ष्य करुन ते नष्ट केले. हे हल्ले इतके जबरदस्त होते की, अनेक किलोमीटरपर्यंत स्फोटाचे आवाज ऐकू आले. दूर-दूरपर्यंत धुराचे ढग दिसत होते.
सलग 6 महिने युद्ध लढण्याची क्षमता
इस्रायलच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणने आक्रमकपणे एकाचवेळी 5 देशांवर हवाई हल्ले केले. इस्रायल सोबत कुवैत, सौदी अरेबिया, बहरीन आणि संयुक्त अबर अमिरातीवर इराणने हे हल्ले केले. इराणने अमेरिका आणि इस्रायलला इशारा दिलाय की, त्यांच्याकडे सलग 6 महिने युद्ध लढण्याची क्षमता आहे.
याचं प्लांटवर हल्ले होऊ शकतात
आखाती देशांमधील ही लढाई आता पिण्याच्या पाण्यापर्यंत पोहोचू शकते. आखाती देशातील लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी समुद्री पाण्यावर अवलंबून आहे. समुद्राचं खारं पाणी डीसॅलिनेशन प्लांटमधून पिण्यायोग्य बनवलं जातं. आता याचं प्लांटवर हल्ले होऊ शकतात. इराणने आमच्या अशाच एका प्लांटवर हल्ला केलाय असा दावा बहरीनने केला आहे.