इस्रायलच्या प्रचारातही ‘चौकीदार’ची हवा, नेत्यान्याहू पाचव्यांदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

तेल अवीव : भारताचा सध्याच्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक देश म्हणजे इस्रायल. इस्रायलमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मंगळवारी मतदान होत आहे. इस्रायलच्या निवडणुकांमध्येही भारताच्या लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचाच फंडा वापरला जातोय. इस्रायल आणि भारतातही दहशतवाद हाच मुद्दा आहे. त्यामुळे दोन्ही देशात हाच प्रमुख मुद्दा आहे. इस्रायलचे पंतप्रधान आणि मोदींचे जवळचे मित्र बेंजामिन नेत्यान्याहू यांची इलेक्शन विनिंग मशीन […]

इस्रायलच्या प्रचारातही चौकीदारची हवा, नेत्यान्याहू पाचव्यांदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत
Follow us on

तेल अवीव : भारताचा सध्याच्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक देश म्हणजे इस्रायल. इस्रायलमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मंगळवारी मतदान होत आहे. इस्रायलच्या निवडणुकांमध्येही भारताच्या लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचाच फंडा वापरला जातोय. इस्रायल आणि भारतातही दहशतवाद हाच मुद्दा आहे. त्यामुळे दोन्ही देशात हाच प्रमुख मुद्दा आहे. इस्रायलचे पंतप्रधान आणि मोदींचे जवळचे मित्र बेंजामिन नेत्यान्याहू यांची इलेक्शन विनिंग मशीन अशी ओळख आहे. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला चौकीदार सांगतात. तर नेत्यान्याहू स्वतःला ‘मिस्टर सिक्यॉरिटी’ म्हणतात. मोदींप्रमाणेच नेत्यान्याहू यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही. पण दोघांनाही पुन्हा सत्तेचा विश्वास आहे. भारतात पहिल्या टप्प्याची निवडणूक 11 एप्रिलला होत आहे, तर इस्रायलमध्ये 9 एप्रिलला मतदान होतंय. विशेष म्हणजे इस्रायलमध्ये प्रचारही भारताच्याच स्टाईलमध्ये झाला.

कशी आहे इस्रायलची लढत?

इस्रायलमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काँटे की टक्कर आहे. पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू पाचव्यांदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले असून निवृत्त जनरल बेनी गॅट्ज यांचं आव्हान आहे. ब्ल्यू अँड व्हाईट आघाडीचे प्रमुख गॅट्ज नेत्यान्याहू यांना सुरक्षेच्या मुद्द्यावर टक्कर देत असून स्वच्छ राजकारणाचं आश्वासन देत आहेत. जसा भारतात एनडीएचा मुकाबला यूपीएशी आहे, तसंच इस्रायलमध्ये नेत्यान्याहू यांना डाव्या पक्षांचं आव्हान आहे.

इस्रायची संसद कशी आहे?

इस्रायलच्या संसदेत एकूण 120 जागा आहेत. सत्तेत येण्यासाठी एका पक्षाला किमान 3.25 टक्के मतांची आवश्यकता असते. निवडणुकीनंतर योग्य मतं मिळवलेल्या उमेदवाराला (गटनेता) इस्रायलचे राष्ट्रपती सत्तास्थापनेचं निमंत्रण देतात. बहुमत सिद्ध करण्यास सक्षम असेल अशा उमेदवाराची निवड राष्ट्रपतींकडून केली जाते. ही सर्व प्रक्रिया 28 दिवसात केली जाते. इस्रायलच्या इतिहासात आतापर्यंत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. नेत्यान्याहू यांचा लिकूड पक्ष उजव्या विचारसरणीचा आहे, तर त्यांचे विरोधक डाव्या विचारसरणीचे आहेत.

दोन्ही देशांचे पंतप्रधान इतिहास रचणार?

नेत्यान्याहू यावेळीही निवडणूक जिंकल्यास इस्रायलच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे ते पहिलेच व्यक्ती असतील. या विक्रमानंतर ते इस्रायलचे जनक डेविड बेन यांनाही मागे टाकतील. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा विजय मिळवल्यास सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे ते बिगरकाँग्रेसी सरकारचे पहिलेच पंतप्रधान ठरतील.

भारत आणि इस्रायलच्या मुद्द्यांमध्ये साम्य

भारतात निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. इस्रायल आणि भारतात दहशतवादाविरोधात कारवाई हा सर्वात मोठा मुद्दा आहे. मोदींसाठी पाकिस्तान हा त्यांच्या प्रत्येक भाषणासाठीचा जसा मुद्दा असतो, तसं नेत्यान्याहू यांच्यासाठी पॅलेस्टाईन हा मुद्दा आहे.

मोदी स्वतःला जसं चौकीदार सांगतात, तसं नेत्यान्याहू आणि त्यांचे समर्थक त्यांना ‘मिस्टर सिक्यॉरिटी’ म्हणतात. ज्याच्या हातात देश सुरक्षित आहे, असा व्यक्ती नेत्यान्याहू यांना म्हटलं जातं. दहशतवादाप्रमाणेच मुस्लीम लोकसंख्याही दोन्ही देशात मुद्दा असतो. इस्रायलमधील विरोधकांना मत देणं म्हणजे अल्पसंख्यांक अरबी लोकांचं समर्थन असेल, असं नेत्यान्याहू सांगतात. तर भारतात राष्ट्रवाद हा मुद्दा असतो.

भारत आणि इस्रायलचे संबंध

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी इस्रायलचा दौरा केला होता. यावेळी विविध मुद्द्यांवर उभय देशांनी करार केला. शेतीच्या बाबतीत इस्रायल हा अद्ययावत देश मानला जातो. त्यामुळे मोदींनी इस्रायलला भारतात गुंतवणुकीसाठी निमंत्रण दिलं होतं. या पलिकडे जाऊन मोदी आणि नेत्यान्याहू यांची मैत्री अनेक जागतिक व्यासपीठावरही दिसली आहे. जेव्हा पुलवामा हल्ला झाला तेव्हा इस्रायलने जाहीरपणे भारताचं समर्थन केलं होतं. कोणत्याही परिस्थितीत आणि विनाअट भारताला लागेल ती मदत करु असं नेत्यान्याहू म्हणाले होते.