
दक्षिणे लेबनॉनमधून समोर आलेला एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओने लोकांची चिंता वाढवली असून युद्धाचं भयाण रुप दाखवलं आहे. रशियन स्टेट ब्रॉडकास्टर RT पत्रकार स्टीव स्विनी रिपोर्टिंग करत असताना अचानक मिसाइल हल्ला झाला. ते रिपोर्टिंग करत असताना अचानक एका मिसाइलचा त्यांच्या मागे काही मीटर अंतरावर स्फोट झाला. या स्फोटात पत्रकार स्टीव स्वेनी आणि त्यांचे कॅमेरामन अली रिदा जखमी झाले. त्यांना रुग्णालयात घेऊन जावं लागलं. RT नुसार हे दोन्ही पत्रकार दक्षिण लेबनानमधील अल‑कासमिया ब्रिज जवळ रिपोर्टिंग करत होते. त्याचवेळी हा हल्ला झाला. टीम स्पष्टपणे ‘PRESS’ चिन्हासह काम करत होती. त्यावेळी जाणूनबुजून हा हल्ला करण्यात आला असा आरोप रिदा यांनी केला. रशियन परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा हीच शंका व्यक्त केली.
“स्विनी आणि त्यांचे सहकारी असलेल्या कारवर इस्रायलच्या फायटर जेटने हल्ला केला. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे” असं RT च्या एडिटर‑इन‑चीफ मार्गरिटा सिमोनियन यांनी एक्सवर लिहिलय. व्हायरल व्हिडिओवर IDF कडून स्पष्टीकरण देण्यात आलय. “पत्रकार ज्या कासमिया क्रॉसिंगवर होता. ते क्षेत्र खाली करण्याचा आधीच इशारा देण्यात आला होता. आधी इशारा दिला होता. त्यानंतरच हल्ला केला. इस्रायल पत्रकारांना लक्ष्य करत नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसारच काम करतो” असं इस्रायली संरक्षण दलाने म्हटलं आहे.
आतापर्यंत 1000 लोकांचा मृत्यू
इस्रायल-अमेरिकेने इराण आणि त्यांच्या मित्रांवरील हल्ले अजून गतिमान केले आहेत, त्यावेळी ही घटना घडली. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलकडून हवाई आणि जमिनी कारवाई सुरु आहे. लेबनॉनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात आतापर्यंत 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे. 10 लाख लोक विस्थापित झालेत.
रशिया आणि इस्रायलमधील तणाव आणखी वाढला
हा हल्ला चुकून झालेला नाही. खासकरुन अलीकडच्या काही महिन्यात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पत्रकार मारले गेलेत असं रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. रशियाने आंतरराष्ट्रीय संस्थांकडे या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे रशिया आणि इस्रायलमधील तणाव आणखी वाढला आहे.