Mission Moon : चंद्रावर जाण्याची चढाओढ सुरू… आता ‘या’ देशाचं मिशन मून लॉन्च; चंद्रावर जाण्याचा उद्देश ऐकाल तर…
भारताने चांद्रयान मोहीम यशस्वी केल्यानंतर अनेक देशांनाही आता चंद्रावर जाण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी अनेक देशात स्पर्धा सुरू झाली आहे. अमेरिका त्यांचे दोन मिशन मून लॉन्च करणार आहे. मात्र, एका देशाने तर आजच चंद्राच्या दिशेने झेप घेतली आहे.

बीजिंग | 7 सप्टेंबर 2023 : भारताचं मिशन मून यशस्वी झाल्यानंतर आता अनेक देशांमध्ये चांद्रयान मोहिमेची चढाओढ सुरू झाली आहे. चंद्रावर जाऊन संशोधन करण्याची अनेक देशांना उत्सुकता लागली आहे. भारत यश मिळवू शकतो तर आपणही यश मिळवू शकतो आणि संशोधनात नवी भर टाकू शकतो असं प्रत्येक देशाला वाटू लागलं आहे. भारतापाठोपाठ आता ऑस्ट्रेलियानेही चांद्रयान मोहिमेची जय्यत तयारी सुरू केली आहे. यावर्षी अमेरिकेचेही दोन मिशन मून लॉन्च होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जपानने आपलं मिशन मून लॉन्च केलं आहे. जपानचं हे मिशन मून अत्यंत आगळंवेगळं आहे. त्यामुळे या मिशनकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
जपानने आज सकाळी मून मिशन लॉन्च केलं आहे. तांगेशिमा स्पेस सेंटरच्या योशीनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून हे मिशन लॉन्च केलं आहे. जपानी स्पेस सेंटरने H-IIA रॉकेटद्वारे यशस्वी लॉन्चिंग केली आहे. रॉकेटसोबत स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून आणि एक्सरे इमेजिंग अँड स्पेक्ट्रोस्कोपी मिशन पाठवण्यात आलं आहे. स्लिम मिशनद्वारे जपानला चंद्रावर आपल्या क्षमतेचं प्रदर्शन करायचं आहे.
तंतोतंड लँडिंग
स्लिम हे एक वजनाने कमी रोबोटिक लँडर आहे. हे लँडर निश्चित स्थळी उतरवलं जाणार आहे. त्याच्या जागेत कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे तंतोतंत लँडिंगचं प्रदर्शन होणार आहे. या मिशनला मून स्नायपरही म्हटलं जात आहे. म्हणजे स्लिमची लँडिंग निश्चित ठिकाणाच्या 100 मीटरच्या परिसरात होईल. या मिशनसाठी 831 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. हे मिशन गेल्या महिन्यातच 26 आणि 28 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार होतं. पण खराब वातावरणामुळे हे मिशन पुढे ढकललं गेलंय.
इंधन वाचवण्याच्या हिशोबाने
इंधन जास्तीत जास्त वाचवण्याच्या हिशोबाने स्लिम चंद्रावर पाठवलं जात आहे, असं जपानी अंतराळ संस्थेचे अध्यक्ष हिरोशी यामाकावा यांनी सांगितलं. हे यान चंद्रावर पुढील वर्षी फेब्रुवारीत लँड होणार आहे. तंतोतंत लँडिंग करणं हा या मिशनचा हेतू आहे. म्हणजे जिथे काम करू शकतो तिथे नव्हे तर, जिथे आपल्याला हवं तिथेच यान लँड झालं पाहिजे, असा जपानचा हेतू आहे.
कुठे उतरणार यान
जपानचा स्लीम लँडर चांदच्या निअर साइडला म्हणजे आपल्या डोळ्यांनी दिसतो त्या ठिकाणी हे यान उतरणार आहे. मेअर नेक्टारिस असं या साइटचं नाव आहे. त्याला चंद्राचा समुद्रही म्हटलं जातं. याला चंद्रावरील सर्वाधिका काळोख असलेला भागही म्हटलं जातं. स्लिममध्ये अॅडव्हान्स्ड ऑप्टिकल आणि इमेज प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीही लावण्यात आली आहे.
उद्देश काय?
जपानचं हे यान चंद्रावर जाऊन ओलिवीन दगडांची तपासणी करणार आहे. त्यामुळे चंद्राच्या उत्पत्तीची माहिती मिळणार आहे. त्यासोबत एक रोव्हरही पाठवला आहे. तसेच XRISM सॅटेलाइटही पाठवलं आहे. हे सॅटेलाईट चंद्राच्या चोहोबाजूने फेरी मारेल. हे सॅटेलाईट जपान, नासा आणि यूरोपियन स्पेस एजन्सीने तयार केलं आहे. या द्वारे चंद्रावरील प्लाझ्मा हवेची तपासणी होणार आहे. त्यामुळे ब्रह्मांडातील तारे आणि आकाशगंगाच्या उत्पत्तीची माहिती मिळणार आहे.
