
Pahalgam Terror Attack : पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. हल्ल्यानंतर भारताने तात्काळ निर्णय घेत पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी केल्याने पाकिस्तान हादरला आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाय लेव्हल बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानवर कधीही हल्ला करण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे पाकिस्ताननेही सीमेवर जमवाजमव सुरू केली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानातील नेते मात्र बरळू लागले आहेत. बरळणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांच्या या यादीत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांचे नाव जोडले गेले आहे. पाकिस्तानवर हल्ला करण्यापूर्वी दहावेळा विचार करा. आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, अशी दर्पोक्तीच मरियम नवाज यांनी केली आहे. पाकिस्तानवर कोणीच हल्ला करू शकत नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.
एनआयने दिलेल्या माहितीनुसार मरियम नवाज एका कार्यक्रमात बोलत होत्या. आज भारत-पाकिस्तानच्या सीमेवर टेन्शन आहे. एक धोका आहे. पण काळजी करण्याची गरज नाही. अल्लाहने पाकिस्तानच्या सैन्याला बळ दिलं आहे. पाक सैन्य प्रत्येक हल्ल्याचं उत्तर देऊ शकते. पाकिस्तानवर हल्ला करताना कोणताही दुश्मन दहा वेळा विचार करेल. याचं कारण म्हणजे अल्लाहच्या कृपेने पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत, असं मरियम नवाज म्हणाल्या.
यावेळी मरियम यांनी माजी पंतप्रधान आणि त्यांचे वडील नवाज शरीफ यांचं कौतुक केलं आहे. पाकिस्तानला अण्वस्त्रधारी करण्यात माझे वडील नवाज शरिफ यांची ऐतिहासिक भूमिका आहे, असं मरियम म्हणाल्या.
पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक पावले उचलली. भारताने सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. त्यासोबत इतर निर्णयही घेतले आहेत. त्याला उत्तर म्हणून पाकिस्तानने भारताचे एअरस्पेस बंद केले आहे. आता पाकिस्तान भारताला अणुबॉम्बची धमकी देत आहे. दरम्यान, युद्ध टळावे म्हणून पाकिस्तानने प्रयत्न सुरू केले आहेत. भारताला समजावे म्हणून पाकिस्तानने रशिया आणि तुर्कस्थानला गळ घातली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकांवर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. काल रात्री हाय लेव्हल मिटिंग झाल्यानंतर आज मोदी चार बैठका घेणार आहेत. त्यामुळे या बैठकांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातही कॅबिनेटची बैठक होणार असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.