
अमेरिका-इस्रायलने मिळून संयुक्तित्या इराणवर हल्ला केल्याने सुरू झालेल्या युद्धाचा आज 31 वा दिवस आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या संघर्षात प्रचंड नुकसान झालं, जीवितहानीही झाली असून याचा फटका तिन्ही देशांसह जगालाही बसला आहे. एकीकडे युद्धामुळे जगात अशांतता नांदत असून उर्जा संकट तीव्र होताना दिसत आहे, तसेच यामुळे जीवितहानीही होताना दिसत्ये. भारतालाही या संघर्षाचा पटका बसत असून युद्धामुळे तिथे अडकलेले किंवा नोकरीनिमित्ताने राहणारे भारतीयांना देखील झळ बसत्ये, अनेक जण बळी पडले आहेत. याचसंदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता कुवेतच्या वीज आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर झालेल्या इराणी हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.
कुवेतच्या विद्युत आणि जल मंत्रालयाने सोमवारी पहाटे ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्ट केली आहे. या हल्ल्यात प्लांटच्या एका सर्व्हिस बिल्डिंगचेही नुकसान झाल्याचे त्यात नमूद करण्यात आलं “कुवेतवरील इराणी हल्ल्याचा एक भाग म्हणून, एका विद्युत आणि जलशुद्धीकरण प्लांटमधील सर्व्हिस बिल्डिंगवर हल्ला करण्यात आला, ज्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आणि इमारतीचे मोठे नुकसान झालं” असं इराणी हल्ल्यानंतर मंत्रालयाच्या प्रवक्त्या फातिमा अब्बास जौहर हयात यांनी सांगितलं.
इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात भारतीय नागरिकाचा झालेला मृत्यू ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही अनेक भारतीयांनी हल्ल्यांमध्ये आपले प्राण गमावले आहेत. इराणमधील युद्धाची बिघडत चाललेली परिस्थिती पाहता, तिथे अडकलेले भारतीय मायदेशात सुरक्षित परतावेत, यासाठी भारत सरकार सतर्कपणे सतत प्रयत्न करत आहे.
आत्तापर्यंत किती भारतीयांनी गमावला जीव ?
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षात आणि दोन्ही बाजूंच्या हल्ल्यांमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये आत्तापर्यंत एकूण 7 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. तर एक भारती. नागरिक अद्याप बेपत्ता आहे. गेल्या शुक्रवारी राजधानी दिल्लीत पश्चिम आशियातील घडामोडींवर झालेल्या आंतर-मंत्रालयीन बैठकीदरम्यान, आखाती देशांचे अतिरिक्त सचिव, असीम महाजन यांनी ही माहिती दिली होती. तर आजच्या घटनेनंतर मृत भारतीयांची संख्या आता एकूण 8 झाली आहे.
गेल्या आठवड्यात देखील एका भारतीयाचा मृत्यू झाला होता. गुरुवारी अबू धाबीमध्ये झालेल्या हल्ल्यात आणखी एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला, असं अतिरिक्त सचिव असीम महाजन यांनी सांगितलं. अबू धाबीमधील भारतीय दूतावास पीडित कुटुंबियांच्या सतत संपर्कात असून, मृतदेह मायदेशी लवकरात लवकर परत आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आहे असं सांगत महाजन यांनी पीडित कुटुंबियांप्रति सरकारच्या वतीने तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या.
युद्धग्रस्त भागातून बचावकार्य सुरू
अबू धाबीवर झालेल्या इराणी हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला, तर आणखी एक जण जखमी झाला आहे. या भारतीय नागरिकाला किरकोळ दुखापत झाली होती, उपचारानंतर त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. गेल्या आठवड्यापर्यंत विविध घटनांमध्ये एकूण सात भारतीय नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत, तर एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आणि मृतांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ओमान, इराक आणि UAEमधील भारतीय दूतावास हा स्थानिक अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहेत.
28 फेब्रुवारी रोजी इराण वि. अमेरिका-इस्रायलचं युद्ध सुरू झाल्यापासून 4 लाख 75 हजार भारतीय सुखरूप परतले आहेत, असं भारत सरकारतर्फे सांगण्यात आलं. सौदी अरेबिया आणि ओमानमधील विमानतळांवरून लोकांना बाहेर काढले जात आहे. कतारची हवाई हद्द अंशतः पुन्हा उघडण्यात आली असून, तिथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, UAE आणि बहरीनची हवाई हद्द गेल्या आठवड्यापर्यंत बंद होती. त्यामुळे, अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी विविध पर्यायी मार्गांचा वापर केला जात आहे. या मार्गांमध्ये अर्मेनियामार्गे इराण ते भारत, जॉर्डनमार्गे इस्रायल ते भारत, जॉर्डन आणि सौदी अरेबियामार्गे इराक ते भारत, आणि सौदी अरेबियामार्गे कुवेत व बहरीन ते भारत यांचा समावेश आहे.